धुळे - तालुक्यातील मेहेरगाव येथील अमोल विश्वास भामरे या ३८ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी घडली. व्यसनी मुलाच्या जाचाला कंटाळून आईनेच पोटच्या मुलाला जीवानिशी संपवण्याची सुपारी दिली असल्याचा धक्कादायक प्रकार या घटनेतून समोर आला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अमोलच्या आईसह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे.
मेहेरगाव येथील अमोल विश्वास भामरे या ३८ वर्षे तरुणाचा गेल्या दोन दिवसांपूर्वी मृतदेह आढळून आला होता. अमोलचा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. याप्रकरणी गुन्हेगारांचा धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून पुंडलिक गिरधर भामरे याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता पुंडलिकने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली.
यात पुंडलिक भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल हा कुठलाही कामधंदा करीत नसल्याने तसेच पैशांसाठी घरी कुटुंबीयांना नेहमी त्रास द्यायचा घरातील पत्नी, आई-वडील, मुलांशी तो नेहमी भांडण करायचा त्याच्या त्रासाला कंटाळून पोटच्या मुलाला कायमचे संपवण्यासाठी त्याची आई लताबाई विश्वास भामरे यांनी पुंडलिक भामरे यांना २५ हजारांची सुपारी दिली.
ठरल्याप्रमाणे पुंडलिक भामरे याने ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अमोलला फोन करून मेहेरगाव येथील बस स्टँड परिसरात बोलावले. त्यानंतर इतर दोन जणांना सोबत घेऊन ते नवलाने परिसरातील जी टी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारात पार्टी करायला बसले याची संधी साधत तिघांनी अमोलचा वायरने गळा आवळून खून केला. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोलचा मृतदेह आढळून आल्यानंतर याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अमोल भामरे याची आई लताबाई भामरे आणि पुंडलिक गिरधर भामरे या दोघांना ताब्यात घेतले आहे.