सोलापूर : शाळेच्या बैठकीत मुख्याध्यापक व सहशिक्षकांसमोर शिक्षकाने पीडित शिक्षिकेचा हात पकडत तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. शिवाय जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी पीडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून शिक्षक संतोष महामने याच्यावर अनुसुचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
कुमठानाका परिसरातील एका शाळेत पीडित शिक्षिका ही कार्यरत असून तेथेच आरोपी शिक्षक कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी त्या शिक्षकाने टोमणे मारत, चोर येथे काम करत असतात असे म्हटले. यामुळे पीडित शिक्षिकेने याबाबत मुख्याध्यापकांना तक्रार दिली. यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी याबाबत बैठक बोलावली. या बैठकीत शिक्षिकेने आपली तक्रार सांगताच आरोपी शिक्षक संतोष महामने याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच जातीवाचक शब्द वापरले. शिवाय शिक्षिकेचे हात पकडून स्वत: जवळ ओढत हात मूरगाळले. शिवाय बैठकीतील सर्व सह शिक्षकांना धक्काबुक्की करत मारहाण केली, अशा आशयाची फिर्याद पीडित शिक्षिकेने दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी संतोष महामने यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.