सूरत – गुजरातच्या सूरत शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. याठिकाणी एका घरात मोलकरणीनं ८ महिन्याच्या मुलाला निर्दयी मारहाण केली असून या चिमुरड्याला उपचारासाठी हॉस्पिटलला भरती करण्याची वेळ आली आहे. मोलकरणीनं केलेले हा संतापजनक प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. शनिवारी या प्रकरणी पोलिसांनी माहिती देण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेने मुलाला अतिशय बेदम मारहाण केली होती. या महिलेच्या मारहाणीवरुन मुलाच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. मारहाणीमुळे मुलाला ब्रेन हॅमरेज झालं आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत असं रांदेर पोलीस ठाण्याचे अधिकारी पी. एल चौधरी यांनी सांगितले.
नेमकं काय घडलं?
सूरत शहरात एका दाम्पत्याला जुळी मुलं आहेत. दोघंही पती-पत्नी नोकरीनिमित्त घराबाहेर असतात. त्यासाठी मुलांचा सांभाळ करण्यासाठी जोडप्याने एका महिलेला कामावर ठेवले होते. या महिलेनं मुलाला मारहाण केल्याची बातमी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज शोधलं. त्यात महिला मुलाला मांडीवर घेऊन मारत होती तर कधी बेडवर आपटत होती. जवळपास दीड तास महिलेने हे कृत्य केले. ते सगळं सीसीटीव्ही कैद झालं आहे. सध्या महिलेला ताब्यात घेतलं असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२ दिवसांपूर्वीच घरात सीसीटीव्ही लावले
एसीपीनं सांगितले की, सप्टेंबर २०२१ पासून ही महिला जोडप्याकडे कामाला होती. मुलांच्या वडिलांनी घरात २ दिवसांपूर्वीच सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. कारण जोडप्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले होते जेव्हा तुम्ही घरात नसता तेव्हा तुमच्या मुलांच्या रडण्याचा जोरजोरात आवाज येत असतो असं मुलांचे वडील म्हणाले.
कोविड रिपोर्ट येताच बेड्या ठोकणार
एसीपी जेड आर देसाई म्हणाले की, जेव्हा आम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा महिला त्रस्त असल्याचं दिसून आले. दुसऱ्याच गोष्टीचा राग महिला मुलांवर काढत होती. आरोपी महिलेवर कलम ३०७ आणि ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या महिलेला ताब्यात घेतले आहे. परंतु या महिलेचा कोविड १९ रिपोर्ट येताच तिला अधिकृतपणे बेड्या ठोकणार असल्याचं पोलीस म्हणाले.