सध्याच्या युगात मोबाईलचे व्यसन प्रत्येकाला जडले आहे. त्यात लहान मुलांचीही सुटका नाही. शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पालक मोबाईल देतात. पण याच मोबाईलमुळे घडलेल्या एका प्रकाराने सर्वांना विचार करण्यास भाग पाडले आहे. एका १४ वर्षाच्या मुलीवर तिच्याच शाळेत आग लावल्याचा आरोप आहे. या कृत्याने २० लोकांचा जीव गेला आहे. टीचरने मुलीकडील मोबाईल जप्त केल्यानं आरोपी मुलीचा संताप अनावर झाला. मोबाईल जप्त केल्याने रागावलेल्या विद्यार्थिनीने शाळेला आग लावण्याची धमकीही दिली होती. हे प्रकरण साऊथ अमेरिकेच्या गुयाना देशातील आहे.
डेलीस्टार रिपोर्टनुसार, सोमवारी रात्री महदिया सेकेंडरी स्कूलच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररुप धारण करत शाळेचा मोठा भाग चपाट्यात घेतला. त्यात अनेक विद्यार्थी आणि शिक्षक फसले. तात्काळ अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. परंतु आग विझेपर्यंत त्यात अडकलेल्या २० जणांचा मृत्यू झाला. राजधानी जॉर्ज टाऊनहून जवळपास २०० मील अंतरावर सेंट्रल गुयाना येथे ही घटना घडली.
आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यात आग लावणारी अन्य कुणी नसून याच शाळेची मुलगी आहे. या मुलीचा मोबाईल टीचरने जप्त केला होता. त्यामुळे ती नाराज होती. या गोष्टीचा तिला इतका राग आला होता ज्याने २० जणांचे प्राण गेले. रागाच्या भरात या मुलीने अख्ख्या शाळेला आग लावली. आरोपी मुलगीही या आगीपासून वाचू शकली नाही. तिलाही आगीची झळ बसली.
पोलिसांचा धक्कादायक खुलासाशाळेच्या प्रशासनाने मोबाईल जप्त केला म्हणून मुलीने शाळेला आग लावली असं पोलिसांनी म्हटलं. तर ही मुलगी वयस्क माणसाच्या संपर्कात होती. त्यामुळे कारवाई म्हणून तिचा मोबाईल जप्त केला होता. आरोपी मुलीचे वय १४ वर्ष आहे. जिचा फोन टीचरने जप्त केल्यानंतर तिने गर्ल्स हॉस्टेलला आग लावण्याची धमकीही दिली होती असं गुयाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेराल्ड गौविया यांनी सांगितले.
आरोपी मुलगीही जखमीआग लागल्यामुळे शाळेतील इतरांसोबत आरोपी मुलगीही जखमी झाली. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिला अटक करण्यात येईल. सध्या हॉस्पिटलमध्ये ९ जणांवर उपचार सुरू आहेत ज्यांची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, या ह्दयद्रावक घटनेने अमेरिकेसारख्या देशांनी गुयानाला मदतीचं आश्वासन दिले आहे. या देशांनी DNA चाचणीसाठी फोरेन्सिक एक्सपर्ट पाठवण्याचे सहकार्य केले आहे. आगीत जळाल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मृतांमध्ये १२-१८ वर्षातील मुलींचा समावेश आहे. शाळेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या ५ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. अग्निशमन दलाने भिंत तोडून काही जणांना वाचवण्यात यश मिळवले.