गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना इंडोनेशियात घडली आहे. याठिकाणी एका शिक्षकाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इस्लामिक शाळेत शिकवणाऱ्या या शिक्षकाने तब्बल १३ विद्यार्थिनींवर बलात्कार केला. शिक्षकाच्या या कृत्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप उसळून आला होता. सुरुवातीला आरोपी शिक्षकाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. परंतु पालकांनी विरोध करत मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली होती.
रॉयटर्सच्या बातमीनुसार, शिक्षक हेरी वीरावन याच्या क्रूर कृत्यामुळे इंडोनेशियामधील धार्मिक बोर्डिंग स्कूलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे हे प्रकरण खूप चर्चेत आले. या शाळेत शिकणाऱ्या मुलांना कसं सुरक्षित ठेवता येईल याबाबतही चिंता निर्माण झाली. त्यामुळे सुरक्षित भावना निर्माण होण्यासाठी अशाप्रकारे आरोपी शिक्षकाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याआधी शिक्षक हेरी वीरावन याला फेब्रुवारीत बांडुंग सिटी कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.
मात्र शिक्षकाने केलेल्या कृत्यामुळे पालक संतप्त झाले होते. त्यांनी कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत पुन्हा याचिका दाखल केली. या शिक्षकाला मृत्यूदंड द्यावा अशी विनंती पालकांकडून कोर्टाला करण्यात आली. सोमवारी बांडुंग कोर्टाने या प्रकरणी निकाल सुनावला. कोर्टाच्या वेबसाईटवर याबाबत स्टेटमेंट जारी केले आहे. त्यानुसार, आरोपी शिक्षकाला मृत्यूची शिक्षा दिल्याचं म्हटलं आहे. हेरीच्या वकिलांनी कोर्टाच्या निर्णयावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. तर कोर्टाच्या निकालानंतर पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. देशाचे बालसंरक्षण मंत्री यांनी कोर्टाच्या निकालाचं स्वागत केले आहे. मात्र देशातील मानवाधिकार आयोगाने आरोपीला मृत्यूची शिक्षा सुनावण्याचा विरोध केला आहे. हे योग्य नाही असं आयोगाने म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
२०१६ ते २०२१ या कालावधीत हेरी वीरावन याने १२ ते १६ वयोगटातील मुलींचं लैंगिक शोषण केले. त्यात ८ विद्यार्थिनी गर्भवती राहिल्या. इंडोनेशिया जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम राष्ट्रांपैकी एक आहे. याठिकाणी हजारो संख्येत इस्लामिक बोर्डिंग स्कूल आणि अन्य धार्मिक शाळा आहेत. ज्याठिकाणी गरिबांचे मुले शिक्षणासाठी येत असतात.