इंदूर: प्रेमात विश्वासघात झाल्यानं एका समलैंगिक तरुणानं आतमत्या केल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. ३१ डिसेंबरला घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी ८९ दिवसांनंतर प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हिमांशु शर्मा असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. जीवन संपवण्यासाठी आधी त्यानं २ पानांचं पत्र लिहिलं आहे. त्यात त्यानं आत्महत्येसाठी अमन मंसुरी नावाच्या तरुणाला जबाबदार धरलं.
अमननं तीन वर्षे शरीर संबंध ठेवले. जेव्हा त्याची इच्छा पूर्ण झाली, तेव्हा तो आता मला तरुणी हवी असल्याचं म्हणू लागला. दोन महिन्यांपासून त्यानं मला त्रास दिला. माझा छळ केला. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचं हिंमाशुनं पत्रात म्हटलं आहे. या प्रकरणी राजेंद्र नगर पोलीस ठाण्यात आरोपी अमन मंसुरीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अमनविरोधात नोंदवण्यात आला आहे. पोलीस सध्या अमनचा शोध घेत आहेत.
हिमांशुनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीमी हिमांशु शर्मा.. अतिशय त्रस्त होतो. माझ्या आत्महत्येला अमन मंसुरी जबाबदार आहे. त्यानं माझा छळ केला. इतका त्रास मला कोणीही दिला नव्हता. तो स्वच्छेने माझ्या घरी ३ वर्षे राहिला. त्यानं माझं शारीरिक शोषण केलं. त्याचं मन भरलं तेव्हा आता मला तरुणी आवडत असल्याचं सांगू लागला. त्यानं याआधी एका तरुणाचा विश्वासघात केला होता. त्यानं मला मोकळेपणाने जगूच दिलं नाही. एका तरुणीच्या प्रेमात त्यानं २ महिने माझा छळ केला. काल रात्री त्यानं मला मारहाण केली. त्यानं माझ्या हाताचा चावा घेतला.
अशा माणसाला अजिबात सोडू नका. या देशाच्या कायद्याला आणि पोलिसांना तशी माझी विनंती आहे. प्रत्येकाला आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या व्यक्तीला सोडू नका. त्यानं माझ्याशी जबरदस्तीनं विवाहदेखील केला. मी त्याला शोधण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र माझ्यासोबत काही करणार नाही, असा विश्वास त्यानं मला त्यावेळी दिला. एका तरुणीपायी त्यानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं.