जळगाव - एकत्र कुटुंबातून वेगळे निघालेल्या भावजयीच्या घरात घुसून दिराने विनयभंग केला. ही घटना विवाहितेच्या सासरी घडल्यानंतर ती माहेरी आल्यावर देखील येथे सासरा व जेठाने येऊन मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावातील माहेर असलेल्या तरुणीचे २००७ मध्ये पंजाबमधील तरुणाशी लग्न झाले. लग्नानंतर सासरची मंडळी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले. त्यामुळे विवाहिता वेगळी निघाली. २०२१मध्ये विवाहितेच्या दिराने घरात येऊन विवाहितेचा विनयभंग केला. त्यानंतर विवाहिता माहेरी आल्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये विवाहितेचे सासरे व जेठ जळगावात आले. त्यांनी विवाहितेला स्टॅम्प पेपरवर सह्या मागितल्या असता हे पेपर कशाचे आहे, असे विवाहितेने विचारले. त्या वेळी तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच वारंवार फोन करून जिवे ठार मारण्याची धमक्या दिल्या जात आहे.
या प्रकरणी विवाहितेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सासरच्या १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि. उल्हास चऱ्हाटे करीत आहेत.