पलामू - झारखंडच्या पलामू जिल्ह्यात अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. याठिकाणी एका महिला २ मुलांसह फासावर लटकली. त्यात महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला तर दुसरा बचावला आहे. पती दुसरं लग्न करणार याचा राग मनात धरून महिलेने हे टोकाचं पाऊल उचललं. मुलांना पाळण्यात खेळण्याच्या बहाण्याने महिला घेऊन गेली आणि पंख्याला लटकून आत्महत्या केली.
पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. रंगेया गावातील २८ वर्षीय महिला शांती देवी तिच्या १२ वर्षीय मोठा मुलगा छोटू आणि ८ वर्षीय कुणालसोबत राहत होती. तिचा पती पुण्यात मजुरी करायचा. २० जानेवारीच्या मध्यरात्री शांतीदेवी तिच्या दोन्ही मुलांसह फासावर लटकली. परंतु मोठा मुलगा थोडक्यात वाचला मात्र शांतीदेवी आणि कुणालचा मृत्यू झाला.
मोठा मुलगा रात्रभर मृतदेहाशेजारी झोपला त्यानंतर सकाळी उठल्यावर त्याने आजीला ही घटना सांगितली. घटनास्थळी पोहचलेल्या लोकांना शांतीदेवी आणि कुणाल मृतावस्थेत आढळले. त्यानंतर स्थानिकांनी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवले. पोलीस अधिकारी कमलेश कुमार म्हणाले की, शुक्रवारी रात्री महिलेने झोपाळ्यात खेळण्याचं म्हटलं. त्यानंतर महिलेने फास मुलांसह स्वत:च्या गळ्यात अडकवला. मोठ्या मुलाने कपडा कापून स्वत:चा जीव वाचवला मात्र महिला आणि लहान मुलाला गळफास लागला असं त्यांनी म्हटलं.
एक वर्षापूर्वी पतीने केलं होतं दुसरं लग्नपोलिसांच्या तपासात कळालं की, पुण्यात महिलेचा पती विकास मजुरी करायचा. एक वर्षापूर्वी विकासनं दुसरं लग्न केले होते. त्यानंतर पहिली पत्नी आणि दुसरी पत्नी गावात एकत्र राहत होती. २ दिवसापूर्वी विकासने ५ हजार रुपये शांतीला घरखर्च भागवण्यासाठी दिले. शांतीकडे फोन नव्हता. त्याने शेजारच्या मोबाईलवर फोन करून हे सांगितले. नेमकं शांतीदेवीने आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत.