बंगळुरू - बऱ्याचदा सासू-सुनेच्या नात्यातील वाद तुम्हाला ऐकायला मिळाले असतील परंतु कर्नाटकच्या बंगळुरू इथं एका सुनेला सासूचा इतका राग आलाय ज्यामुळे ती सासूचा जीव घेण्याचा विचार करत होती. सुनेने एका डॉक्टरला व्हॉट्सअपवर मेसेज करून सासूला मारण्यासाठी असं कुठलं औषध आहे का याची विचारणा केली. हा मेसेज पाहून डॉक्टरच्याही पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ या मेसेजची कल्पना स्थानिक पोलिसांना दिली. ही महिला कोण याची कल्पना डॉक्टरला नाही. परंतु तिने सर्व मेसेज डिलिट करून डॉक्टरचा नंबर ब्लॉक केला आहे.
महिलेने मेसेज डिलिट करण्यापूर्वी डॉक्टरने त्याचा स्क्रिनशॉट्स घेतला. तो स्क्रिनशॉट्स आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित डॉक्टर हे सामाजिक आणइ राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे हे कदाचित एक षडयंत्रही असू शकते असा दावा डॉक्टरांनी केला आहे. डॉक्टर सुनील कुमारने पोलिसांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी मला इन्स्टाग्रामवर सहाना नावाच्या महिलेने फॉलो केले. तिने रुग्ण बनून माझा फोन नंबर मागितला होता. मी त्या महिलेला फोन नंबर दिला. त्यानंतर १७ फेब्रुवारीला सहाना हिने मला WhatsApp वर मेसेज केला असं त्यांनी म्हटलं.
काय लिहिलं होतं मेसेजमध्ये?
सहाना - हॅलो, मला तुम्हाला काही तरी विचारायचं आहे, परंतु भीती वाटते तुम्ही मला ओरडाल
डॉक्टर - बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला?
सहाना - मला सांगायला भीती वाटत आहे
डॉक्टर - घाबरू नका, सांगा मला
सहाना - मला एखादं असं औषध सांगाल का जेणेकरून मी माझ्या सासूची हत्या करू शकते?
डॉक्टर - हत्या...पण का?
सहाना - माझी सासू माझा खूप छळ करते, मी त्यांना आणखी सहन करू शकत नाही.
डॉक्टर - मी डॉक्टर आहे, आमचं काम लोकांचा जीव वाचवण्याचा आहे, ना कुणाचा जीव घेणे...
दरम्यान, सहानाने हे सर्व मेसेज डिलिट केले, त्यानंतर माझा फोन नंबरही ब्लॉक केला. मात्र मी तिच्या मेसेजचे स्क्रिन शॉट्स घेतले होते. ती महिला कोण आहे हे मी ओळखत नाही. कदाचित ती माझ्याविरोधात काही षडयंत्र करत असेल कारण मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरतो. याआधी मी विजयपुरा इथून विधानसभेची निवडणूक लढवली होती असा दावा डॉक्टरने केला आहे.