नवी मुंबई : मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये झालेल्या वादातून रेल्वे पोलीस व त्याच्या मित्राला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मारहाण करणाऱ्यांमद्ये सराईत गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे समजते. याप्रकरणी कोपर खैरणे पोलीस ठाण्यात १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
दीपक कोल्हे (४१) असे मारहाण झालेल्या रेल्वे पोलिसाचे नाव आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास कोपर खैरणे सेक्टर १४ येथील क्वालिटी पंजाब हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. ठाणे रेल्वे पोलीस दलात असलेले कोल्हे मागील काही दिवसांपासून सुट्टीवर असून घटनेच्या दिवशी रात्री मित्रासोबत हॉटेलमध्ये बसलेले होते. सदर आस्थापनेला हॉटेलची परवानगी असून त्याठिकाणी पहाटेपर्यंत मद्यपान चालते. कोल्हेंच्या बाजूच्याच टेबलवर काही तरुण देखील बसलेले होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादातून त्या तरुणांनी कोल्हे व त्यांच्या मित्राला बेदम मारहाण केली.
हॉटेलमधील टेबल, खुर्च्या यासह बियरच्या बाटल्या फेकून त्यांना मारल्या. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. दरम्यान घडलेल्या प्रकाराबद्दल कोल्हे यांना विचारले असता, प्रकरण दडपण्याचा उद्देशाने त्यांनी उद्धट उत्तर दिले. या घटनेप्रकरणी कोपर खैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून दोघांना अटक करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये काही सराईत गुन्हेगारांचा देखील समावेश असल्याचे समजते. तर या घटनेमुळे मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरु ठेवून मद्यपान चालत असल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. अशा ठिकाणी मद्यपान चालत असल्याने रात्री अपरात्री गुन्हेगार वावरत असल्याचेही दिसून येत आहे.