आग्रा: उत्तर प्रदेशच्या आग्र्यातील झारपुरा गावातील एका घरात जोरदार स्फोट झाला. त्यामुळे परिसरात खळबळ माजली. स्फोटामुळे घराच्या दरवाजे, खिडक्यांचं नुकसान झालं. यानंतर घरमालकानं जावयाविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
झारपूर गावात वास्तव्यास असलेल्या लाखन सिंह यांच्या घरात पहाटे चारच्या सुमारास जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून घरातील सगळे सदस्य बाहेर पळाले. गावातही खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमेंद्र मीणा, सीओ सौरभ कुमार गावात पोहोचले.
जावई हरी सिंह विरोधात घरमालक लाखन सिंह यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. हरी सिंह ताजगंजचा रहिवासी आहे. जावई गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं लाखन सिंह यांनी पोलिसांना सांगितलं. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी वर्षभरापूर्वी माहेरी निघून गेली. तेव्हापासून हरी सिंह पत्नीला धमक्या देत होता.
रविवारी हरी सिंह पत्नीला बोलावण्यासाठी सासरवाडीत आला होता. मात्र पत्नीनं घरी परतण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या पतीनं पहाटे सासऱ्यांच्या घरात सुतळी बॉम्ब ठेवला आणि अगरबत्तीच्या मदतीनं तो पेटवला. त्यानंतर जोरदार स्फोट झाला. त्यामुळे लोकांची झोपमोड झाली. सगळे घराबाहेर पडले. तेव्हा त्यांना घडलेला प्रकार समजला.