धुळे : बंद घर फोडून चोरट्याने ७ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना बुधवारी रात्री घडली. सिसाेदिया परिवार घरी परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुरुवारी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला.
निवृत्त प्रभारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कोमलसिंग भिमसिंग सिसोदिया (वय ६२, रा. श्रीनाथ नगर, नकाणे रोड, देवपूर) यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सिसोदिया परिवार कुठे बाहेर गेल्यामुळे त्यांच्या घराला कुलूप लावलेले होते. ही संधी साधून चोरट्याने त्यांच्या घराला लावलेले कुलूप तोडले.
घरात प्रवेश करुन संसारपयोगी साहित्याचे नुकसान करत घरातील गोदरेजचे कपाट फोडले. त्यात ठेवलेले सोन्याची मंगलपोत, सोन्याचे कानातले, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचा राणीहार, सोन्याच्या पाटल्या, सोन्याचे झुंबळ, चांदीचे कडे, चांदीच्या साखळ्या, चांदीचे मेडल असा एकूण ७ लाख १९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्याने शिताफीने लांबविला. ही घटना बुधवारी रात्री ८ ते रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडला.
सिसोदिया परिवार घरी परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच पश्चिम देवपूर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार, गुरुवारी दुपारी ४ वाजता घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे करीत आहे.