प्रेमात अन् युद्धात कोणतेही नियम नसतात- कोर्ट; बलात्काराच्या आरोपातून युवक दोषमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 01:53 PM2024-08-15T13:53:10+5:302024-08-15T13:56:05+5:30
२०१४ मध्ये एका पुरुषावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या फिर्यादीला त्याच पुरुषाकडून दुसरे मूल झाले
डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, चेन्नई: २०१४ मध्ये एका पुरुषावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या फिर्यादीला त्याच पुरुषाकडून दुसरे मूल झाले. मध्यस्थी प्रक्रियेदरम्यान हा प्रकार घडला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने बलात्कारात शिक्षा झालेल्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले, “प्रेमात आणि युद्धात कोणतेही नियम नसतात.”
आरोपी आणि २१ वर्षीय महिला दूरचे नातेवाईक असून, ते शेजारी राहत होते. महिलेचे वडील वारले होते आणि ती तिच्या आजीसोबत राहत होती. २० मे २०१२ रोजी आरोपीने पीडितेच्या घरात प्रवेश केला. तिच्यावर जबरदस्ती केली आणि धमकी देऊन बलात्कार केला. २०१४ मध्ये तिने मुलाला जन्म दिला. यानंतर तिने आरोपीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली. २०१७ मध्ये जिल्हा महिला सत्र न्यायालय, कुड्डालोरने आरोपीला १० वर्षांची शिक्षा सुनावली. याला त्याने हायकोर्टात आव्हान दिले.
नेमके काय झाले?
- हायकोर्टाला महिलेच्या पोटी जन्मलेल्या मुलाच्या कल्याणाची चिंता वाटली.
- या चिंतेचे निराकरण करण्यासाठी, मुलाच्या भवितव्याबाबत तोडगा काढण्याच्या आशेने हे प्रकरण मध्यस्थीकडे हायकोर्टाने पाठवले.
- मध्यस्थीत तोडगा निघाला नाही. बलात्काराच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता करताना, हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले की, “तक्रार, गुन्हा, खटला किंवा शिक्षा यापैकी काहीही आरोपी व फिर्यादीला वेगळे करू शकले नाही.”
महिला घटनेच्या वेळी प्रौढ; तिला माहीत होते
- महिला घटनेच्या वेळी प्रौढ होती. तिला माहीत होते किंवा किमान माहीत असले पाहिजे की ती कशात गुंतली आहे.
- तिने मूल होईपर्यंत कोणताही आरोप लावला नव्हता. त्यांनी अनेक वेळा शरीरसंबंध मान्य केले. ट्रायल कोर्टाने मात्र याकडे दुर्लक्ष केले.
तरुण मुला मुलींनी त्यांच्या इच्छेनुसार जगण्याचा मार्ग निवडल्यास, देशाची घटना नैतिकतेचे विधान करत नाही.हे प्रकरण कदाचित ‘प्रेमात आणि युद्धात कोणतेही नियम नसतात’ या विधानाची साक्ष आहे.
- न्यायमूर्ती एन. शेषशायी