सतना - अलीकडच्या पती-पत्नी यांच्यातील वाद आणि त्यातून घडणारे हत्येसारखे गंभीर गुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. त्यातच मध्य प्रदेशातील सतना येथे पती-पत्नी यांच्यातील घरगुती हिंसाचाराचा हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. बऱ्याच महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक महिला तिच्या पतीला घरातील एका बंद खोलीत बेदम मारहाण करताना दिसते. पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत चौकशी सुरू केली आहे.
या घटनेबाबत पीडित पतीने सांगितले की, आमचं लग्न २०१७ साली झालं होते. लग्नाच्या सुरुवातीचे ७ वर्ष सर्व काही सुरळीत होते. परंतु आठव्या वर्षी माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर पत्नीने माझ्याकडे १० लाख रूपये मागितले. इतकेच नाही तर जर पैसे दिले नाहीत तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवेन अशी धमकीही दिली. वडिलांच्या निधनानंतर पत्नीने माझा मानसिक छळ सुरू केला. दररोज ती मला मारायची. २५ ऑक्टोबर २०२४ रोजी तिने मला बेदम मारले, ज्याचा व्हिडिओ मी बनवला आणि तो नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असं त्याने सांगितले.
तसेच पत्नी रोज मध्यरात्री २-३ वाजता घरी येते, कधी कधी १०-१० दिवस ती घरीच येत नाही. ती सातत्याने कुणाशी तरी फोनवर बोलत असते. शिवीगाळ करते. मला मारून टाकण्याची धमकी देते. तिने एकदा मला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. माझी आई एकटीच असते. तिची तब्येत ठीक नाही, तिलाही खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मी माझ्या घरात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत. त्यात अनेक व्हिडिओ रेकॉर्ड झाले आहेत असं पीडित पतीने म्हटलं.
व्हायरल व्हिडिओ अन् पोलीस कारवाई
सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत पत्नी तिच्या पतीला बंद खोलीत बेदम मारताना दिसून येते. याबाबत पोलिसांनी दखल घेऊन कारवाईला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ जेव्हा आम्ही पाहिला तेव्हा त्यात एक व्यक्ती रेकॉर्डिंग करतोय. त्याची पत्नी त्याला मारताना दिसते. या व्हिडिओची आम्ही पडताळणी करत आहोत. या वादाचे कारण काय ते तपासले जात आहे. आतापर्यंत यात कुणीही तक्रार दिली नाही परंतु व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे असं कोलगंवा पोलीस ठाण्याचे अधिकारी सुदीप सोनी यांनी सांगितले.
दरम्यान, पती-पत्नी यांच्यातील वाद अनेक वर्षापासून आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पत्नीने पतीवरच मारहाणीचा आरोप करत खोटा गुन्हा दाखल केला आहे. परंतु पत्नीपासून जीवाचा धोका असल्याचं पतीने सांगितले. माझी खूप जणांची ओळख आहे. तुला कधी उचलून नेतील कळणारही नाही असं पत्नीने धमकी दिल्याचं पतीने म्हटलं आहे.