हरदा: मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यात ३५ वर्षीय तरुणानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. तरुणानं आत्महत्येपूर्वी पत्नीला व्हॉट्स ऍपवर मेसेज केला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. सतीश बिझाडे असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याच्या लग्नाला दोन वर्षेदेखील पूर्ण झालेली नाहीत. सतीशच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
हरदामध्ये वास्तव्यास असलेल्या सतीश बिझाडेचा विवाह जून २०२० मध्ये समोता तिलवारीशी झाला. समोता वन विभागात वनरक्षक पदावर कार्यरत आहे. सतीशनं बीटेक केलं आहे. मात्र त्यानंतरही त्याला नोकरी नव्हती. लग्नानंतर लगेचच दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यामुळे दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला.
१५ एप्रिलला समोता कामासाठी रहटगावला गेली. त्यावेळी सतीश हरदा येथील घरात होता. समोता शनिवारी माहेरी थांबली. त्याच रात्री १ वाजता सतीशने समोताला व्हॉट्स ऍपवर मेसेज केले. ते तिनं सकाळी वाचले. 'मी चाललोय, तू नीट राहा. नोकरी असलेल्या व्यक्तीशी दुसरं लग्न कर,' असं सतीशनं मेसेजमध्ये म्हटलं होतं.
मेसेज वाचल्यानंतर लगेचच समोतानं सतीशला कॉल केले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर समोतानं हरदा गाठलं. घराचा दरवाजा बंद होता. तिनं पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना सतीशचा मृतदेह आढळून आला. त्यानं गळफास लावून घेतला होता. सतीशनं दोन पानांची सुसाईट नोट लिहिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दोन वर्षांपूर्वी सतीशसोबत विवाह झाल्याची माहिती समोतानं पोलिसांना दिली. दोघांमध्ये लग्नानंतर लगेचच वाद सुरू झाले. प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं. ४ जानेवारीला सतीशनं समोताचे दोन्ही मोबाईस नंबर आक्षेपार्ह शब्दांसह सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर समोताले अनेक ठिकाणाहून कॉल आले. त्याबद्दल समोतानं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.