बैतूल: मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये एका प्रेम प्रकरणात भयंकर शेवट झाला आहे. विवाहित महिलेची तिच्या प्रियकरानं चाकूनं भोसकून हत्या केली. प्रियकर महिलेवर चाकून वार करत होता, त्यावेळी तिचा लहान मुलगा तिथेच होता. प्रियकरानं केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बैतूलच्या सारणीमध्ये सोमवारी दुपारी एका प्रियकरानं त्याची प्रेयसीची चाकूनं भोसकून हत्या केली. त्यानं प्रेयसीवर १६ वार केले. दोघांचे २ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या नात्याला पूर्णविराम देण्याचा प्रेयसीचा प्रयत्न होता. त्यामुळे प्रियकर संतापला. त्यानं तिच्यावर चाकूनं हल्ला केला. यावेळी महिलेचा लहान मुलगा तिथेच होता. प्रेयसीवर हल्ला केल्यानंतर आरोपी प्रियकर फरार झाला. घटना पाहून घाबरलेला चिमुरडा कपाटात जाऊन लपला.
संदीप साहू असं आरोपीचं नाव आहे. तर मृत पावलेल्या महिलेचं नाव रुबिना आहे. संदीपनं १६ सपासप वार करून रुबिनाला संपवलं. या घटनेनं परिसरात खळबळ माजली. ही घटना रुबिनाच्या लहान मुलानं घडताना पाहिली. संदीप दुपारच्या सुमारास रुबिनाच्या घरी पोहोचला होता. त्यानं रुबिनावर चाकूनं वार केले. गंभीर अवस्थेत रुबिनाला घोडाडोंगरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
रबिना आणि संदीप यांचे २ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. रुबिनाचा मुलगा मोठा होत असल्यानं तिनं संदीपसोबतचे प्रेमसंबंध संपवायचं ठरवलं. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संदीपनं रुबिनावर चाकूनं १६ वार केले. संदीप गेल्या २ वर्षांपासून रुबिनाला त्रास देत होता, असं रुबिनाचा पती आसिफ अलीनं सांगितलं. ६ महिन्यांपूर्वी संदीपनं रुबिनावर हल्ला केला होता. त्यात तिच्या डोक्याला जखम झाली. त्याची तक्रार सारणी पोलीस ठाण्यात केली होती. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असंही त्यांनी सांगितलं.