जयपूर – राजस्थानच्या जयपूर इथं हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मध्य प्रदेशातील नवी नवरी पतीसोबत हनीमूनसाठी जयपूरला आली होती. हे दोघेही पर्यटनस्थळ फिरल्यानंतर हॉटेलला पोहचले. त्यानंतर नवरा पुढील ठिकाणी जाण्यासाठी कार बुक करायला बाहेर पडला. काही वेळाने तो परत आला पण पत्नी तिच्या खोलीत नव्हती. पत्नीला सर्वठिकाणी शोधले परंतु तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही.
नवऱ्याने हॉटेलमध्ये लागलेले सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली. तेव्हा पत्नी सामान घेऊन हॉटेलच्या बाहेर जाताना दिसली. तातडीने पतीने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय युवकाचे २९ जुलैला २२ वर्षीय युवतीसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर ५ ऑगस्टला दोघे हनीमूनसाठी जयपूरला आले. याठिकाणी चौमू पुलिया इथं एका हॉटेलमध्ये रुम बूक केली होती.
हॉटेलच्या खोलीतून नवरी झाली गायब
दुपारीच्या १२ च्या सुमारास पती-पत्नी आमेर किल्ला भटकंतीसाठी गेले. त्यानंतर ३ वाजता ते हॉटेलमध्ये माघारी परतले. काही वेळ आराम करून संध्याकाळी रिंगस येथील बाबा खाटूश्याम मंदिरात दर्शन करण्याचं प्लॅनिंग केले. पत्नी खोलीत थांबली आणि पती हॉटेलशेजारीस कार बुक करण्यासाठी बाहेर पडला. त्यानंतर १५ मिनिटांनी पती हॉटेलच्या खोलीत आला तेव्हा पत्नी गायब झाली होती. पतीने तिला आवाज दिला पण ती सापडली नाही. मोबाईलवर कॉल केला परंतु तिने उचलला नाही. हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा पत्नी मोबाईलवर बोलत बोलत हॉटेलबाहेर पळताना दिसली.
लग्नाच्या एक आठवड्यानंतरच नवरी पळाल्यानंतर नवऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता ५ ऑगस्टला दोघे कपल हनीमूनसाठी जयपूरला आले होते. परंतु हॉटेलमध्ये पती-पत्नी यांच्यात काही कारणास्तव वाद झाला. पती कार बूक करण्यासाठी गेला असता पत्नी नाराज होऊन हॉटेलमधून निघून गेली. पतीने पत्नीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली. लवकरच महिलेचा शोध घेतला जाईल अशी माहिती पोलीस अधिकारी बजरंगलाल शर्मा यांनी दिली.