नालंदा जिल्ह्यातील बिहारशरीफमध्ये राम नवमीपासून हिंसाचार सुरु आहे. या दंग्यामध्ये अनेक शोरुम, दुकाने लुटल्याचे प्रकार घडले आहेत. यामध्ये डिजिटल दुनिया नावाच्या शोरुममधून तब्बल तीन कोटी रुपयांचे मोबाईल, टीव्हीसारखी उपकरणे लुटून नेण्यात आली आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून शोरुमच्या मालकाने यावर आपली व्यथा जाहीर केली आहे.
'डिजिटल दुनिया' चे मालक हैदर आझम यांनी म्हटले की, मुंबईत राहून बिहारमध्ये रोजगार मिळावा म्हणून तिकडे व्यवसाय सुरु केला होता. अशा प्रकारची घटना पाहून कोण बिहारमध्ये काम करायला येईल? हैदर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओसह पोस्ट केली आहे. याद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह तेजस्वी यादव यांनादेखील टॅग केले आहे.
महाराष्ट्रात भाजपाचे पदाधिकारी...हैदर आझम हे महाराष्ट्रात भाजपाचे प्रदेश सचिव आहेत. तसेच मौलाना आज़ाद अल्पसंख्यक वित्तीय विकास निगम लिमिटेडचे अध्यक्षही होते. यावर असताना त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला होता. हैदर यांचा धाकटा भाऊ डिजिटल दुनियाचे बिहारमधील काम सांभाळतो. त्यांचे बिहारमध्ये ८ शोरुम आहेत. बिहारशरीफमधील त्या शोरुमचे उद्घाटन भाजपाचे माजी मंत्री मंगल पांडे आणि सय्यद शाहनवाज हुसेन यांच्या हस्ते झाले होते.
बिहार शरीफमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला आहे. मुकेश कुमार असे मृताचे नाव सांगितले जात आहे. निवारी सायंकाळी झालेल्या हिंसाचारानंतर येथे 12 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. आतापर्यंत पोलिसांनी 106 जणांना अटक केली होती. बिहारशरीफमधून 80 आणि सासाराममधून 26 जणांना अटक करण्यात आली आहे.