मेरठ - उत्तर प्रदेशात सातत्याने धक्कादायक प्रकार समोर येत आहेत ज्यातून पती-पत्नीच्या नात्यावर प्रश्न उभे केलेत. कधी प्रियकराच्या प्रेमासाठी पतीची हत्या, तर कधी भयंकर कट रचून पतीचा कायमचा काटा काढणे या घटना घडत आहेत. मेरठची मुस्कान, औरैयाची प्रगती हे प्रकरण चर्चेत असतानाच आता मुझफ्फरनगर इथं अशीच खळबळजनक घटना घडली आहे. पिंकी नावाची महिला, जिचं २ वर्षापूर्वीच लग्न झाले तिने पतीच्या खूनाचा प्रयत्न केला आहे. कॉफीत विष मिसळून पतीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंकीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मुझफ्फरनगर जिल्ह्यातील भायंगी येथील रहिवासी २६ वर्षीय अनुज शर्माचं २ वर्षापूर्वी गाझियाबादच्या पिंकीसोबत लग्न झालं होते. अनुज मेरठ इथल्या एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होता. लग्नाच्या काही महिन्यातच पिंकी आणि अनुज यांच्यात वाद सुरू झाला. पिंकी आपल्यामागे कुणाशी तरी बोलत असते अशी शंका अनुजला होती. बऱ्याचदा यावर अनुज आणि पिंकीत वाद झाला. अनुजने पिंकीला समजवण्याचा प्रयत्नही केला होता.
या घटनेबाबत अनुजची बहीण मीनाक्षीने सांगितले की, अनुज कामावर जायचा त्यानंतर पिंकी तासनतास मोबाईलवर कुणाशी तरी बोलत असायची. या दोघांमधील वाद इतके वाढले होते त्यामुळे पिंकीने अनुजविरोधात मारहाणीची तक्रार दिली होती. पोलिसांनी दोघांनाही बोलावून तोडगा काढला. एकेदिवशी अनुजने पिंकीचा मोबाईल हिसकावून त्यातील प्रियकरासोबतचे मेसेज आणि फोटो पाहिले. हा प्रियकर दुसरा तिसरा कुणी नसून पिंकीचाच नातेवाईक होता. २५ मार्च संध्याकाळी पिंकीने अनुजला कॉफीतून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. कॉफी प्यायल्यानंतर अनुजची तब्येत बिघडली. त्याला मेरठच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं तिने म्हटलं.
दरम्यान, अलीकडेच औरैया येथील प्रगतीने लग्नाच्या १५ दिवसात प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला. प्रगती आणि दिलीप एकमेकांना आधीपासून ओळखायचे. प्रगतीच्या अफेअरचे पुढे येताच तिच्या घरच्यांनी दिलीपसोबत तिचे लग्न लावून दिले. मात्र प्रियकर अनुरागसोबत मिळून प्रगतीने दिलीपचा काटा काढण्याचं ठरवलं. १९ मार्च रोजी दिलीप त्याच्या शेतात गंभीर अवस्थेत आढळला. त्यानंतर ३ दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. तपासात पोलिसांनी प्रगती आणि तिचा प्रियकर अनुरागला अटक केली.