नंदूरबार - सुनेसोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर येणाऱ्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना अक्कलकुवाच्या मंडारा येथे घडली आहे. याबाबत मयत मुलाचा बाप आणि पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुकलाल वसावे असं मयताचे नाव असून ते ३२ वर्षाचे होते. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये ईश्वर वसावे आणि मयताची पत्नी यांचा समावेश आहे. पोलीस सूत्रांनुसार, सुकलाल यांची पत्नी आणि सुकलालचा बाप यांच्यात अनैतिक संबंध होते. या संबंधांना सुकलाल अडसर येत असल्याने त्याचा काटा काढण्याचे दोघांनी ठरवले. २४ मार्च रोजी घरात कुणी नसताना दोघांनी सुकलाल याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याच्या मृत्यूचा बनाव रचला.
सुकलालच्या अचानक मृत्यूने सगळेच हैराण झाले. मात्र संशयितांनी गावातील लोकांना आणि नातेवाईकांना त्याच्या छातीत दुखत असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबत मयताच्या आईने फिर्याद दिल्याने दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक तपास अधिकारी योगेश चौधरी करत आहेत.
दरम्यान, अलीकडेच अनैतिक संबधांतून होणाऱ्या हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. उत्तर प्रदेशात मेरठ येथे प्रेम प्रकरणातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे समोर आले. याठिकाणी लंडन येथे काम करणारा पती भारतात आल्यानंतर त्याची प्रियकराच्या मदतीने हत्या करण्यात आली. हत्या करून पतीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते ड्रममध्ये सिमेंटमध्ये गाडण्यात आले. त्यानंतर औरैया येथेही लग्नाच्या १५ दिवसातच पतीची हत्या करण्याचं षडयंत्र पत्नीने रचल्याचं समोर येताच पोलिसांनी तिला अटक केली.