नाशिक - अंबड चुंचाळे घरकुल योजनेतील एका घरात पत्नीचा गळा चिरून हत्या केल्यानंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सातपूरच्या शिवाजीनगर भागात मंगळवारी पत्नीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही अशीच घटना समोर आल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुंचाळे घरकुल येथील इमारत क्रमांक १९ मध्ये दुसऱ्या मजल्यावर भुजंग तायडे (वय ३५) हा कुटुंबासमवेत राहत असून, त्याने बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पत्नी मनीषा तायडे (३०) हिच्या मानेवर चाकूने वार करीत गळा चिरून ठार केले. यानंतर स्वतः भुजंग याने स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुले क्लासवरून घरी आल्याने त्यांनी आई-वडिलांना दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. परंतु, आतून कोणीही दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी शेजारच्यांना सांगितले. त्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला असता घरातील पलंगावर मनीषा तायडे मृतावस्थेत पडलेली होती. भुजंग तायडे याने स्वयंपाकगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले असून, या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत भुजंग तायडे हा पिठाच्या गिरणीत कामगार होता . त्याला दोन मुले असून, या घटनेने दोन्ही मुलांचे छत्र हरविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पती-पत्नीचे मोबाइल पोलिसांच्या ताब्यात
चुंचाळे भागात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घटनास्थळी पोलिस दाखल होताच पोलिसांनी ताबडतोब घरात शिरूर पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी पती भुजंग व पत्नी मनीषा या दोघांचेही मोबाइल ताब्यात घेतले असून, या मोबाइलच्या आधारे पोलिस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी घटनास्थळावर भेट देऊन पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहे.
चारित्र्याच्या संशयातून घटना
मृत भुजंग तायडे हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी होता. रोजगाराच्या शोधात तो नाशिकमध्ये येऊन येथेच स्थायिक झाला होता. परंतु, मागील काही दिवसांपासून पती भुजंग तायडे याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होता. त्याच वादातून भुजंग याने मनीषाचा गळा चिरून स्वत:ला संपविल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चुंचाळेतील घरकुल योजनेत पत्नीचा खून पतीने केल्याची घटना समोर आली असून, या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलिसांनी दोघांचेही मोबाइल फोन ताब्यात घेतले असून, अधिकचा तपास सुरू आहे - चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त परिमंडळ २ नाशिक