नोएडा: उत्तर प्रदेशमधील नोएडात माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरावर आयकर विभागानं धाड टाकली. आयकर विभागाला राम नारायण सिंह यांच्या घरात घबाड सापडलं आहे. आयकर अधिकाऱ्यांच्या हाती कोट्यवधींची रोकड लागली आहे. याशिवाय सोनं, हिऱ्याचे दागिनेदेखील सापडले आहेत. घराच्या बेसमेंटमध्ये सोन्याची बिस्किटं, विटा सापडल्या आहेत. या सगळ्यांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.
सिंह यांच्या घराची झडती घेत असताना आयकर विभागाला ६५० लॉकर आढळून आले. यातल्या एका लॉकरमध्ये सोन्याची वीट सापडली. विशेष म्हणजे या दागिन्यांवर, रोख रकमेवर दावा सांगण्यासाठी अद्याप कोणीही पुढे आलेलं नाही. सोन्याची विटेची किंमत ४५ लाख रुपये आहे. तर उर्वरित दागिन्यांची किंमत दीड कोटी रुपयांची आसपास आहे.
सिंह यांच्या घरातून हिरे, मोती, चांदी, सोन्याचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. याआधी आयकर विभागाला लॉकरमधून जवळपास ६ कोटी रुपये मिळाले होते. ही रक्कम मोजताना आयकर विभागानं आणलेल्या मशीन हँग झाल्या. या रोख रकमेवर अद्याप कोणीही दावा सांगितलेला नाही. त्यामुळे हे काळं धन असल्याचं मानून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. दागिन्यांवरदेखील अद्याप कोणीही दावा केलेला नाही.
आयकर विभागानं सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटं यांच्यासह सर्व दागिने ताब्यात घेतले आहेत. आयपीएस अधिकाऱ्याच्या घरात एकूण ६५० लॉकर्स आढळून आली. पैकी २० संशयास्पद आढळून आले. या २० पैकी ६ लॉकर फोडून तपास पुढे सुरू ठेवण्यात आला आहे. सिंह यांनी उत्तर प्रदेश पोलिसात महासंचालकपद भूषवलं आहे. आपला मुलगा लॉकर भाड्यानं देऊन त्याबदल्यात कमिशन घेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.