भुवनेश्वर: ओदिशामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या महिला उमेदवाराच्या पतीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर पत्नीनं विषारी औषध पिऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा जीव वाचला. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेनं ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती. त्यात तिचा पराभव झाला.
महिलेचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जिंकलेल्या गटाचे लोक तिच्या पतीला टोमणे मारू लागले. टोमण्यांमुळे वैतागलेल्या पतीनं आत्महत्या केली. त्याचं नाव रमाकांत परिदा असं आहे. रमाकांत परिदा यांच्या पत्नी सुमती यांच्यावर कटकमधील एसबीसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भद्रक जिल्ह्यातील बासुदेवपूरमधील पद्मपूर ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली.
पंचायत समिती सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी बिजू जनता दलाच्या अशोक नायक यांनी बाजी मारली. नायक आणि त्यांच्या समर्थकांनी रविवारी जंगी मिरवणूक काढली. त्यावेळी रमाकांत परिदा यांचा नायक यांच्या समर्थकांशी वाद झाला. समर्थकांनी रमाकांत यांना त्यांच्या पत्नीच्या पराभवावरून टोमणे मारले. त्यामुळे निराश झालेले रमाकांत घरी गेले. तिथे त्यांचा पत्नीशी वाद झाला.
वाद झाल्यामुळे पत्नीनं किटकनाशक खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पत्नीची अवस्था पाहून रमाकांत यांनी गळफास लाऊन घेतला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या पत्नीवर सध्या कटकमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी परिदा यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.