पट्टोकी: महिला आणि अल्पसंख्यांकावरील गुन्ह्यांमध्ये जगभरात बदनाम असलेल्या पाकिस्तानात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे माणुसकीलाच काळिमा फासला गेला आहे. पंजाब प्रांतातल्या पट्टोकी शहरात लग्न समारंभात सहभागी झालेल्या पाहुण्यांनी एका पापड विक्रेत्याला बेदम मारहाण केली. एका वादावरून झालेल्या बाचाबाचीचं रुपांतर पुढे मारहाणीत झालं.
लग्न सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांनी पापड विक्रेत्याला बेदम मारलं. त्यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर पाहुणे मंडळी तिथेच आनंद साजरा करत होते. पापड विक्रेत्याचा मृतदेह हॉलमध्येच असताना त्याच्या शेजारीच पाहुण्यांनी जेवणावर ताव मारला. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी हॉलच्या व्यवस्थापकासह १२ जणांना अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पापड विक्रेत्याचा मृतदेह फरशीवर पडून असल्याचं आणि त्याच्या आसपास पाहुणे मंडळी कबाब आणि बिर्याणीवर ताव मारत असल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. अशरफ उर्फ सुलतान असं मृताचं नाव आहे. या घटनेबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
पंजाब फॉरेन्सिक सायन्स एजन्सीच्या पथकानं घटनास्थळाहून पुरावे गोळा केले आहेत. सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि हॉलमध्ये असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेली दृश्यं यांच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बजदार यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला आहे.