लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : जीवनसाथी मेट्रोमोनीयल साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने लग्नाच्या आमिषाने साॅफ्टवेअर इंजिनियर तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच त्याने व त्याच्या दोन साथीदारांनी तरुणीकडून पैसे घेऊन तिची दहा लाखांची फसवणूक केली. हा प्रकार मे २०२२ ते ६ सप्टेंबर २०२२ या कालावधीत हिंजवडी येथे घडला.
साॅफ्टवेअर इंजिनियर असलेल्या पीडित तरुणीने याप्रकरणी शनिवारी (दि. १०) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एक महिलेसह तिघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील मास्टरमाइंड असलेल्या एका आरोपीने वेगवेगळ्या नावांचा आणि प्रोफाइलचा वापर करून मेट्रोमोनीयल वेबसाईटवरून नोंदणी केली. त्यामाध्यमातून विवाहइच्छुक महिला आणि तरुणींशी तो ओळख करतो. त्याच पद्धतीने त्याने फिर्यादी तरुणीसोबत मे महिन्यात जीवनसाथी मेट्रोमोनीयल साईटद्वारे ओळख केली. तो स्वतः मोठा व्यावसायिक असल्याचे भासवून त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीसोबत लग्न करणार असल्याचे आश्वासन दिले. हिंजवडी येथील लॉजवर तीनवेळा फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर फिर्यादीसोबत लग्न न करता त्यांची फसवणूक केली.
फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांचा विश्वास संपादन करून मास्टर माइंड असलेल्या आरोपीने व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्याच्या आईच्या बॅंक खात्यावर फिर्यादीकडून ऑनलाईन माध्यमातून १२ लाख ७५ हजार रुपये घेतले. त्यातील दोन लाख ७५ हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित १० लाख रुपये परत न करता फिर्यादी तरुणीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर तपास करीत आहेत.