लोकमत न्यूज नेटवर्कराहुरी (जि. अहमदनगर) : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात रविवारी अधिकृत व अनधिकृत विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. अनधिकृत गटाच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी अधिकृत विद्यार्थ्यांचा गट थेट कुलगुरू कार्यालयात लपून बसला. हे समजताच अनधिकृत गटाच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयावर जोरदार दगडफेक केली. सुरक्षारक्षक व विद्यापीठ प्रशासनाने हस्तक्षेप करून त्यांच्यातील वाद मिटविला.
कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यापीठात देशभरातून विद्यार्थ्यांची ऑनलाईन निवड केली जाते. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यांना ७० हजार रुपये शुल्क भरावे लागते. विद्यापीठात एकूण १६८ प्रवेश मर्यादा आहे. प्रवेशित विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहतात. या विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये शेकडो विद्यार्थी अनधिकृतरीत्या राहत आहेत. त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून रात्री वादाची ठिणगी पडली. याचे पर्यवसान हाणामारीत झाले. अधिकृत विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी वसतिगृहापासून जवळच असलेल्या कुलगुरू कार्यालयात धाव घेत आसरा घेतला. या मुलांना मारण्यासाठी अनधिकृत विद्यार्थ्यांच्या गटाने कुलगुरू कार्यालयावर दगडफेक केली. सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केला.
विद्यार्थ्यांनी घेतले स्वत:ला कोंडूनदरम्यान, रविवारी अधिकृत प्रवेशित विद्यार्थ्यांनी स्वत:ला काेंडून घेत आंदाेलनाची भूमिका घेतली. कुलगुरूंनी स्वत: लक्ष घालावे, अशी त्यांची मागणी हाेती; पण कुलगुरू तब्येतीच्या कारणामुळे विद्यार्थ्यांना भेटणार नाहीत हे निश्चित असल्याने सायंकाळी विद्यार्थी वसतिगृहामध्ये गेले.दरम्यान,या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती प्रहार जनशक्तीचे आप्पासाहेब ढूस यांनी दिली.
अनधिकृत विद्यार्थ्यांचा आकडा ५०० वरराहुरी कृषी विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये विविध स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी अनधिकृतपणे अनेक विद्यार्थी राहत आहेत. अशा अनधिकृतपणे राहत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५०० पेक्षा अधिक असल्याचे अधिकृत विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
काही परीक्षांच्या काळात बाहेरचे विद्यार्थी येथे येतात. विद्यार्थ्यांमध्ये अंतर्गत वाद हाेते. आता ते वाद मिटविले आहेत.- महानंद माने, कुलमंत्री, राहुरी कृषी विद्यापीठ