नवी दिल्ली - जीव वाचवण्यासाठी रुग्णांना हॉस्पिटलला नेलं जातं परंतु राजस्थानमध्ये एका व्यक्तीला हॉस्पिटलला जाणं जीवावर बेतलं आहे. नशेत बेधुंद अवस्थेत हॉस्पिटलला पोहचलेल्या डॉक्टरच्या कारनं ३ जणांना उडवलं आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून इतर २ गंभीर जखमी आहेत. या जखमींमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील ही घटना आहे.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, पोलिसांनी आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे, मुंडवा समाज कल्याण विभागात कार्यरत असणारे भंवरलाल काही कामानिमित्त हॉस्पिटलला गेले होते. यावेळी एका अनियंत्रित कारच्या धडकेत भंवरलाल यांना जीव गमवावा लागला. तर कारच्या धडकेनं अन्य २ महिला जखमी झाल्या.
५७ वर्षीय भंवरलाल यांच्यासोबत ४० वर्षीय रईसा आणि २० वर्षीय डाजिया बानो या अनियंत्रित कारच्या धडकेत सापडल्या. या अपघातात भंवरलाल यांचं घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य २ जखमी महिलांवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नागौर जिल्ह्यातील हॉस्पिटलच्या गेटवर वेगवान आलेल्या या कारने तिघांना धडक दिली. त्यात भंवरलाल यांना जीव गमवावा लागला. सध्या जखमी महिला यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलं आहे.
दरम्यान या घटनेत जखमी झालेली २० वर्षीय डाजिया बानो ही गर्भवती होती. या अपघातानंतर लोकांनी बेधुंद अवस्थेत असलेल्या कारचालकाला पकडलं. ही कार जिल्हा हॉस्पिटलमध्ये तैनात असलेला डॉक्टर वाईएस नेगी चालवत होते. लोकांनी जेव्हा नेगी यांना पकडलं तेव्हा ते नशेत बेधुंद अवस्थेत होते. लोकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या अपघाताप्रकरणी गुन्हा नोंद करत आरोपी कारचालक डॉ. नेगी यांना अटक केली आहे.
नागौर पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, हॉस्पिटलमधील डॉक्टर वाईएस नेगी ड्यूटीवर जाताना कारने ३ जणांना उडवले. वाईएस नेगी यांना अटक करण्यात आली असून अपघातावेळी डॉक्टर नेगी हे नशेत होते. प्रत्यक्षदर्शीनुसार, ३ लोकांना कारने धडक दिल्यानंतर डॉ. नेगी यांनी हॉस्पिटल परिसरात असलेल्या अन्य एक वाहनालाही धडक दिली असं पोलिसांनी सांगितले.