सांगली : शहरातील संजोग कॉलनी परिसरात आर्थिक देवघेवीतून महिलेचे अपहरण करत तिला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी खासदार संजय पाटील यांच्या तत्कालीन स्वीय सहायकासह अकराजणांना अटक केली आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितामध्ये सांगलीचे खासदार संजय पाटील यांचे तात्कालीन स्वीय सहायक अभिजित पाटील, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तासगाव शहर प्रमुख विशाल शिंदे, युवा सेना तासगाव शहर प्रमुख सुशांत पैलवान यांचा प्रमुख समावेश आहे. सांगली शहरचे प्रभारी निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, सहायक निरीक्षक समीर ढोरे यांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी अभिजित दिलीप पाटील (वय ३०, रा. तासगाव), श्रीकांत शिवाजी कोकळे ( ४०, रा. उमदी, ता. जत), विशाल गोविंद शिंदे (३९, रा. कासार गल्ली, तासगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर अतुल अशोक काळे (२९, रा. गणपती पेठ, सांगली), अमर गोरख खोत ( ३६, रा. संजयनगर, सांगली), श्रीकांत आप्पासो गायकवाड ( ३०, रा. तासगाव), मनोज नारायण चव्हाण ( ३२, रा. कोल्हापूर रोड, सांगली), सुशांत नंदकुमार पैलवान ( ३२, रा. तासगाव), सुयोगराज चंद्रकांत वेल्लार ( ३७, रा. बसस्थानकाजवळ, सांगली), आरीफमहमद बाबासाहेब आत्तार ( ३८, रा. शाहुनगर, जयसिंगपूर), शीतल गोरख भजबळे (३९, रा. संजयनगर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी शिवराज संजय पाटील (रा. संजोग कॉलनी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास सर्व संशयित तीन मोटारीतून पाटील यांच्या घरी गेले. तेथे ‘आम्ही एलसीबीचे लोक आहोत’ असे सांगून स्वाती संजय पाटील (वय ५८) यांना जबरस्तीने गाडीत घालून घेऊन गेले. तेथून संशयितांनी त्यांना मिरजेत नेले. तेथे नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगली शहर पोलिसांनी सर्व संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना ३० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.