सीतामढी - बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात सासरच्या लोकांवर जावयानं धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. सासरच्यांवर काळ बनून आलेल्या जावयानं दिव्यांग मेव्हण्याला सोडलं नाही. या जीवघेण्या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू झाला आहे. सासू आणि मेव्हणा गंभीर जखमी आहे. या दोघांवर मुझफ्फरपूरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेवेळी आरोपीचे वडीलही त्याच्यासोबत होते. गावकऱ्यांनी या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कोरा खडगी गावातील आहे. त्याठिकाणी ५५ वर्षीय बिंदेश्वर महतो यांच्या मुलीचं लग्न बेलसाड गावातील चंदन महतोसोबत झालं होते. बिंदेश्वर महतोशी मुलगी गर्भवती होती. त्यामुळे ती बरेच दिवस आई वडिलांकडे राहत होती. काही दिवसांपूर्वी चंदनच्या बायकोनं एका मुलीला जन्म दिला. पण त्या नवजात मुलीचा मृत्यू झाला. याची माहिती जावयाला मिळाली.
रविवारी चंदन त्याचे वडील राम सेवक महतो यांच्यासोबत सासरी पोहचला. त्याठिकाणी मुलीच्या मृत्यूवरून जावई आणि मुलीच्या सासऱ्यांनी गोंधळ घातला. पत्नीच्या माहेरच्यांनी योग्य उपचार केले नाहीत त्यामुळे नवजात मुलीचा मृत्यू झाला असा त्यांचा आरोप होता. त्यावर बिंदेश्वर महतो, सासू उर्मिला देवी यांचं जावई आणि त्याच्या वडिलांशी भांडण झाले. या वादाचं रुपांतर हाणीमारीत झाले. तेव्हा रागाने जावई चंदनने घरातील धारदार शस्त्र उचलून सासऱ्याच्या डोक्यात वार केले. वार होताच त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. सासऱ्यावर हल्ला केल्यानंतर ओरडणाऱ्या सासूवरही जावयाने वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली.
हा प्रकार बघत असणाऱ्या दिव्यांग मेव्हण्यावरही जावयाने हल्ला केला. मेव्हणा सगळ्यांना सांगेल या भीतीने त्याने हल्ला केला. या हल्ल्यात मेव्हणाही जखमी झाला. या घटनेनंतर तिथून पळ काढणारा जावई आणि त्याचे वडील यांना गावकऱ्यांनी घेरलं आणि दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस तिथे पोहचले आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
मात्र या घटनेत सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सासू आणि मेव्हणा यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सासऱ्याची हत्या करणे, सासू-मेव्हण्याचा हत्येचा प्रयत्न या आरोपात जावई आणि त्याच्या वडिलांना अटक केलीय. पोलीस या प्रकरणी पुढील कार्यवाही करत आहे अशी माहिती सीतामढीचे पोलीस अधिकारी हरकिशोर राय यांनी माहिती दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"