काशिनाथ वाघमारे
सोलापूर : सेंट्रींग कामगार संतोष जगन्नाथ साळुंखे (४५) याच्या खुनाचा २४ तासात छडा लावण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.सुनील रामचंद्र मस्के (१९) व अजय शिवाजी राऊत (वय १८, दोघेही रा. संजय नगर झोपडपट्टी, सांगोला) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणात विधी संघर्ष बालकाला सोलापूर येथील बाल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितले.
संतोष साळुंखे या सेंट्रींग कामगाराच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास सांगोला रेल्वे स्टेशन समोर माळवाडी येथे उघडकीस आली होती. याबाबत मृत संतोषच्या मुलीने फिर्याद दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी मृताच्या नातेवाईकास बोलावून ओळख पटवून घेतली. मयत संतोषचे कोणासोबतही वैर नसल्याने घटनास्थळी कोणत्याही प्रकारचा पुरावा सापडत नव्हता. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणणे आव्हानात्मक होते. परंतु पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी चार पथकं बनवली. या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारावर प्रकरणाचा छडा लावला.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या पथकाने बजावली.
पैशासाठी गाेड बोलून आणले, काठीने मारहाण करुन पळालेआरोपी सुनील मस्के, अजय राऊत व विधी संघर्ष बालक हे तिघेजण जाहिरातीचे फ्लेक्स लावण्याचे काम करतात. सांगोला बस स्थानकावर बसलेल्या संतोषकडे पैशाची बॅग असल्याचे त्यांना समजले. त्यांनी त्याला गोड बोलून दुचाकीवरून बसवून सांगोला रेल्वे स्टेशन समोरील बाह्य वळणावर आणले. येथे त्याचेकडे पैसे मागत काठीने मारहाण केली. त्याच्या कानातून रक्तस्त्राव झाल्याने तो खाली पडला. त्यावेळी विधी संघर्ष बालकाने त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला व त्यास फरपटत नेऊन रोड लगत शेतात टाकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.