पुणे : शहरात टास्कफ्रॉडचा विळखा वाढत चालला असून नागरिकांना लाखो रूपयांचा गंडा घातला जात आहे. शुक्रवारी दाखल झालेल्या दोन गुन्ह्यामध्ये गुगल मॅपवर रेटिंग, रिव्ह्यू आणि कमेंट करण्यास सांगून दोघांना तब्बल १० लाख ६२ हजार रूपयांना फसविले गेले आहे.
पहिल्या घटनेमध्ये २९ वर्षीय तरुणीने पोलिसांना फिर्याद दिली आहे. अनोळखी मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधून गुगल मॅपवर रेटिंग, रिव्ह्यू आणि कमेंट करण्याचे टास्क देवुन त्यामार्फत वेगवेगळे आमिष दाखवून ५ लाख ४५ हजार रूपये भरण्यास सांगून तिची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसर्या घटनेत एका ४८ वर्षीय महिलेने सिंहगडरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवर लिंक पाठवली. त्यावर रजिस्टेशन करण्याच्या बहाण्याने त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर टेलीग्राम लिक पाठवून त्यांच्याशी चॅटींग करून त्यांना वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यात सांगितले. ते पूर्ण केल्यावर त्यांना कमिशन मिळेल असे आमिष दाखवून युपीआय आयडीवर पैसे पाठविण्यास सांगुन त्यांची ५ लाख १७ हजारांची फसवणुक केली. याप्रकरणी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.