नवी दिल्ली : दिल्लीतील कंजावला प्रकरणात अंजली सिंह गाडीखाली अडकल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. त्यामुळे तब्बल १२ किलोमीटर फरफटत नेण्याचा प्रकार अनवधानाने झाला नाही, हे स्पष्ट आहे. अपघातानंतर खूप घाबरून गेल्याने अनेक वेळा कारचे यू-टर्न घेतले, असेही त्यांनी मान्य केल्याचे समोर आले आहे.
येथील कंजावला परिसरात ३१ डिसेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास अंजलीचा भीषण अपघात झाला. या प्रकरणात मनोज मित्तल, दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्णा आणि मिथुन यांना १ जानेवारी रोजी पकडण्यात आले. यानंतर सहावा आरोपी आशुतोष यालाही अटक करण्यात आली.
अंकुश खन्नाला जामीन
या प्रकरणात आपल्या भावाला वाचवण्याचा कट रचणाऱ्या आणि उर्वरित आरोपींना लपवून ठेवणाऱ्या अंकुश खन्ना या आरोपीला शनिवारी जामीन मिळाला. न्यायालयाने २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. ६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे.
पोलिसांना नवे नियम
कंजावला दुर्घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी सर्व अधिकाऱ्यांना रात्रपाळी करताना त्यांची थेट ठिकाणे देण्यास सांगितले आहे. सर्व पोलिस अधिकारी (एसएचओ), दहशतवादविरोधी अधिकारी (एटीओ) आणि तपास निरीक्षक (ब्राव्हो) यांनादेखील पोलिस ठाणे सोडण्यापूर्वी पोलिस उपायुक्तांना कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.