जळगाव : शेअर मार्केटमध्ये काजल ट्रेडिंग कंपनीसोबत ऑनलाईन ट्रेडिंग करून जास्त नफ्याचे आमिष दाखवीत सचिन अशोककुमार मंधान (वय २५, रा. मोहाडी रोड, जळगाव) या तरुणाला इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटद्वारे ५ लाख ७६ हजार १५१ रुपयात गंडविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोमवारी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर ट्रेडर्स काजल इंस्टाग्राम खातेधारकाकडून (फायनांसियल ॲडव्हायजर ॲण्ड ट्रेडर्स) सचिन मंधान यांना मार्च २०२१ मध्ये मेसेज आला होता. काजल ट्रेडिंग कंपनी तुम्हाला चांगला नफा मिळवून देईल. आमची कंपनी सेबी रजिस्टर्ड असून, तुमच्या पैशाची पूर्णपणे जबाबदारी आमची राहील असे सांगून या कंपनीत ऑनलाईन ट्रेडिंग करण्यासाठी तगादा लावला.
सचिन यांनी तेथील नफ्याचे काही प्रकरणे बघितली असता, त्यात नफा झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे या कंपनीत ट्रेडिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक डिमॅट खाते उघडायला लावले; मात्र ट्रेडिंग करता येत नसल्याने संबंधितांनी आम्हीच तुमचे खाते उघडून देतो, त्यासाठी तुम्हाला आलेला युझर आयडी व पासवर्ड सचिन यांच्याकडून घेतला. नंतर संबंधितांनी काजल जैन या नावाने फंड, तसेच वेगवेगळ्या कारणांनी बँकेत वेळोवेळी काही रक्कम भरायला लावली.
नफ्याऐवजी तोटाच...या ट्रेडिंगमध्ये नफा होण्याऐवजी तोटाच दिसून येत होता. त्यामुळे सचिन यांनी ट्रेडिंग बंद केले. त्यानंतर आम्ही तुम्हाला नुकसानभरपाई करून देऊ त्यासाठी आयपीओ करावा लागेल व त्याची किंमत १४ हजार ४०० रुपये आहे. ती रक्कम कंपनीच्या बँक खात्यात भरावी असे सांगून सचिन यांच्याकडून ती रक्कम घेतली. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कारणांनी ५ लाख ७६ हजार १५१ रुपये ऑनलाईन भरायला लावले; परंतु कुठलाच नफा व मुद्दलही मिळाली नाही, उलट तोटाच झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सचिन मंधान यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.