उल्हासनगर - इलेक्ट्रॉनिक वस्तूवर कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४८ जणांची १५ लाख ५९ हजाराने फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात मोहम्मद अली झकरिया याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरातील संच्युरी कंपनी समोरील मुरबाड रोडच्या बाजूला मोहम्मद अली झकरिया यांचे डायमंड मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक शॉप नावाचे दुकान आहे. २२ जानेवारी ते २२ ऑगस्ट २००२ दरम्यान झकरिया याने परिसरातील ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखविले. इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या कर्ज प्राप्तीसाठीचे कागदपत्रे व त्याच्या दुकानातील वस्तू विक्री बिलावर ग्राहकाच्या सह्या घेऊन कोटक महिंद्रा बँक मध्ये दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेत असल्याचे भासवून कर्ज घेतले. १५ लाख ५९ हजार ८८३ रुपयांचे ४८ ग्राहकांवर कर्ज घेतले. मात्र प्रत्यक्षात इलेक्ट्रॉनिक वस्तू त्यांना दिल्या नसल्याने, झकरिया याच्या कृत्याच्या भांडाफोड झाला.
याप्रकरणी गोविंद गवस यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर, पोलिसांनी मोहम्मद अली झकरिया यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. ४८ ग्राहकांना १५ लाख ५९ हजार ८८३ रुपयाने फसवणूक केल्याचे उघड झाले असून असीच फसवणूकीचा प्रकार अन्य नागरिका बाबत केला का? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.