सदानंद नाईक
उल्हासनगर : भाजपचे युवा उपाध्यक्ष व दुकानदार नाणिक वाधवा यांना मारहाण केल्या प्रकरणी भाजपचे नगरसेवक विजू पाटील यांच्यासह ९ जणांविरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होण्यासाठी भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी आदींना ठिय्या आंदोलन करावे लागले.
उल्हासनगर कॅम्प नं-५ ओटी सेक्शन येथील शक्ती गारमेंट दुकाना समोर मोहन नावाचा इसम वडापावची हातगाडी लावत होता. त्यावेळी दुकानदार व भाजपचे युवा उपाध्यक्ष नाणिक उर्फ बाबू वाधवा यांनी गुरवारी हातगाडी लावण्यास मनाई केली. याचा राग वडापाव गाडीधारकला आला. त्याने स्थानिक भाजप नगरसेवक विजु पाटील यांच्याकडे धाव घेऊन झालेला प्रकार सांगितला. नगरसेवक पाटील यांनी कार चालक बंटी, संदीप व इतर ६ ते ८ इसमानी शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता हातगाडी लावण्यास का मनाई केली. याचा जाब पाटील यांनी विचारून दुकानदार व भाजपचा युवा उपाध्यक्ष नाणिक वाधवा यांना जबर मारहाण केली. हिललाईन पोलीस वाधवा यांची तक्रार घेत नसल्याने, भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यासह इतर पदाधिकार्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
भाजप शहाराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यासह पक्ष्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी थिय्या दिल्यावर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला, अशी माहिती नगरसेवक रामचंदानी यांनी दिली. भाजप नगरसेवक विजू पाटील यांनी गेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणूक वेळी बंडखोरी करून शिवसेनेच्या मदतीने स्थायी समिती सभापती पदी निवडून आले. तेंव्हा पासून ते शिवसेने सोबत आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडणुक लढविणार असल्याचे बोलले जाते. याच रागातून भाजपाच्या शहराध्यक्षासह पदाधिकार्यांनी भाजप नगरसेवक विजू पाटील यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्याचे बोलले जाते. भाजपच्या आक्रमक पावित्र्याची भाजप कार्यकर्त्यात उत्साह संचारला असून कॅम्प नं-५ परिसरातील दबंगिरी मोडीत काढू. असा विश्वास शहराध्यक्ष पुरस्वानी यांनी यावेळी व्यक्त केला.