नवी दिल्ली - "साहेब, माझ्या बायकोला गुंडांनी गोळी मारली, मी बायकोला माहेरहून माझ्या घरी घेऊन चाललो होतो. तेव्हा ६ हल्लेखोरांनी आम्हाला घेरलं. त्यांनी आम्हाला मारहाण करत लुटलं, त्यानंतर गोळी मारली..." १४ मे २०२४ रोजी उत्तर प्रदेशातील बरेली इथं राजकुमार नावाचा व्यक्ती ही तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला पोहचला तेव्हा पोलीसही हैराण झाले. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात राजकुमारची पत्नी हेमलताचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तातडीनं या घटनेचा तपास सुरू केला.
या घटनेची चौकशी करताना पोलिसांना घटनास्थळी काही असे निदर्शनास आले ज्यामुळे त्यांच्या मनात संशय निर्माण झाला. जर हल्लेखोर ६ जण असतील तर राजकुमार सुरक्षित कसा राहिला?, जर ते लुटायला आले होते मग राजकुमारचा मोबाईल त्याच्याकडे का सोडला?, जर गुंडांनी लूटपाट केली असेल तर महिलेच्या हातातील बांगड्या तुटल्या कशा नाहीत? कारण महिलेसोबत कुणी जबरदस्ती करत असेल तर ती रोखण्यासाठी हाताचा वापर करते, तेव्हा हातातील बांगड्या तुटतात.
जवळपास ९ दिवस पोलीस या प्रश्नांची उत्तरे शोधत होती त्यानंतर जे उत्तर मिळालं त्यातून हेमलताची हत्या करणारा गुन्हेगार जाळ्यात अडकला. पोलिसांच्या माहितीनुसार, राजकुमार आणि हेमलता यांचं लग्न काही वर्षापूर्वी झाले होते. सुरुवातीला सर्व ठीक होते, परंतु अलीकडे राजकुमारला हेमलतावर संशय होता. हेमलता रिल बनवून सोशल मीडियावर पोस्ट करायची. ही गोष्ट राजकुमारला समजली तेव्हा त्याने हेमलताला मारहाण करत तिचा फोन तोडला. हेमलता या घटनेमुळे नाराज होत माहेरी निघून गेली.
काही दिवसांनी हेमलता गर्भवती असल्याचं राजकुमारला कळालं. त्यामुळे त्याचा संशय आणखी वाढला. त्यामुळे त्याच्या डोक्यात भयानक कट शिजला. १४ मे रोजी राजकुमार हेमलताला घ्यायला तिच्या माहेरी गेला. तिथे हेमलतावर त्याचे खूप प्रेम आहे असं भासवलं. त्यानंतर दुचाकीवर बसवून तिला घेऊन गेला, बाजारात तिला नवीन बांगड्या घेतल्या. दुपारी तो तिला घेऊन घरी जात होता. तेव्हा रस्त्यात निर्जन स्थळी राजकुमारला दुचाकी रोखली. त्यानंतर तुझ्या पोटात कुणाचं बाळ असा सवाल त्याने हेमलताला केला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.
या वादात राजकुमारनं हेमलताला गोळी मारून तिची हत्या केली. या हत्येचं प्लॅनिंग राजकुमारनं आधीच केले होते. त्याने १ दिवस आधी बंदूक आणि २ कारतूस खरेदी केली होती. त्यानंतर मित्र राम बहादुरला कटात सहभागी केले. हत्येनंतर राम बहादुरला फोन केला. त्याचा मित्र घटनास्थळी आला. राम बहादुरनं आधी राजकुमारची दुचाकी खाली पाडली. त्यानंतर हेमलताच्या शरीरावरील दागिने घेऊन तिथून पळून गेला.
दरम्यान, प्लॅनिंगनुसार राम बहादुरने बंदूक लपवली. त्यानंतर राजकुमारनं त्याचे बूट शेतात फेकून दिले. घटनास्थळावरील सर्व पुरावे नष्ट करून राम बहादूर गावात पोहचला आणि राजकुमारला दरोडेखोरानी लुटलं असं गावकऱ्यांना सांगितले. त्यानंतर गावकरी धावत घटनास्थळी गेले, तिथे राजकुमारनं बेशुद्धीचं नाटक केले. त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले. परंतु डॉक्टरांना त्यांच्या शरीरावर कुठेही मारहाणीच्या खूणा दिसल्या नाहीत. त्यानंतर राजकुमारनं पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आणि बनावट कहाणी सांगितली. परंतु ही सर्व पोलखोल पोलिसांसमोर उघड पडली.