झाशी - उत्तर प्रदेशातील झाशी इथं २२ वर्षापूर्वी एका पत्नीनं पतीची साथ सोडली. त्यावेळी पती आर्थिक संकटात अडकला होता. गरिबीशी संघर्ष करणाऱ्या पतीला एकटं सोडून पत्नी मुलांसह निघून गेली. परंतु अचानक ती पत्नी आज परतली कारण पतीला वारसा हक्कानं मिळालेल्या जमिनीवर बुंदेलखंड विकास प्राधिकरणानं हस्तांतरित केली. त्या बदल्यात त्याला २८ लाख रुपये मिळाले. पतीजवळ इतके पैसे येताच पत्नी पुन्हा त्याच्याजवळ आल्याचा प्रकार घडला आहे.
अनेक वर्ष पत्नीला पतीची आठवण आली नाही. परंतु वृद्ध पतीच्या खात्यात २८ लाख रुपये येताच पत्नी तात्काळ पतीजवळ परतली. ती पतीला सोबत घेऊन जाण्यासाठी आली होती. परंतु पतीला तिच्याबरोबर जायचं नव्हतं. त्यामुळे पत्नी आणि तिच्या मुलांनी मिळून वृद्धाकडून दीड लाख रुपये हिसकावून पळून गेले. याबाबत पीडित पतीने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. झाशी मुख्यालयापासून २० किमी अंतरावरील सारमऊ गावात ही घटना घडली आहे.
या गावात ६० वर्षीय अनिल त्यांचे ३ भाऊ आणि त्यांच्या मुलांसोबत राहत होते. जवळपास २२ वर्षापूर्वी अनिल यांची पत्नी त्यांना सोडून निघून गेली. तेव्हा अनिल ट्रक ड्रायव्हर होते. त्यांच्याकडे दीड एकर जमीन होती मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होती. पत्नीचे परपुरुषाशी संबंध होते, त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा वाद व्हायचा. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली पतीला जेलला पाठवलं होते तर पत्नी तिच्या प्रियकरासोबत राहू लागली. गेली अनेक वर्ष मी एकटा राहतोय असं पतीने सांगितले.
गावातील एका मंदिरात पती पुजारी बनला आहे. तेव्हापासून आजतागायत पत्नीने कधीही पतीची विचारपूस केली नाही. मात्र अलीकडेच माझी जमीन सरकारने अधिग्रहण केली त्या बदल्यात माझ्या खात्यात २८ लाख रुपये दिले. ही बातमी पत्नी आणि मुलांना कळताच ते मला परत घेऊन जाण्यासाठी आले. मी त्यांच्यासोबत जायला नकार देताच माझ्याजवळील दीड लाख रुपये हिसकावले असा आरोप पतीने केला आहे.
दरम्यान, पती अनिलच्या या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. ज्या पत्नीने इतकी वर्ष पतीला विचारलं नाही ती पैशांसाठी परतली आणि माझ्याकडील पैसे हिसकावून घेऊन गेली. नशीब म्हणजे माझे बाकी पैसे बँकेत होते. माझा एक मुलगा वकील आहे. जेव्हा माझ्याकडे पैसे आले तेव्हा एक मुलगा माझ्याजवळ आला आणि सोबत राहण्यास विनंती केली होती असंही पती अनिल यांनी सांगितले.