बरेली – उत्तर प्रदेशच्या बरेली इथं छेडछाडीला विरोध केल्यानं एका मुलीला ट्रेनसमोर फेकण्यात आले आहे. या घटनेत मुलीने एक हात आणि २ पाय गमावले. त्यात अनेक हाडे तुटली. गंभीर अवस्थेत मुलीला रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या ही मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. ज्यादिवशी मुलीसोबत ही घटना घडली तेव्हा तिचा बर्थडे होता. परंतु नराधमांनी तिला आयुष्यभराच्या वेदना दिल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण बरेलीच्या सीबीगंज भागातील आहे. मागील मंगळवारी इंटरच्या विद्यार्थिनीचा बर्थडे होता. त्यामुळे ती खूप आनंदात होती. कोचिंगवरून परतल्यानंतर तिने मैत्रिणींसोबत तिच्या वाढदिवसाचा केकही कापला. त्यानंतर घरी परतताना ती नराधमांच्या अत्याचारांना बळी ठरली. ती कोचिंगवरून घरी जाताना काही टवाळखोरांनी मुलीची छेड काढली. जेव्हा या मुलीने त्यांना विरोध केला तेव्हा या मुलांनी मुलीला रेल्वे क्रॉसिंगवरून जाणाऱ्या ट्रेनसमोर फेकले. यात मुलीचे दोन्ही पाय आणि एक हात कापले गेले. ती रक्ताच्या थारोळ्यात रुळावर पडली होती. रात्री ८ वाजता जेव्हा मुलीच्या घरच्यांना याची माहिती मिळाली तेव्हा खळबळ माजली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य पाहत तपासाला सुरुवात केली.
बळजबरीने ‘त्याने’ मुलीचा पाठलाग केला
या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांनी म्हटलं की, एक मुलगा आमच्या मुलीवर दबाव टाकत होता. एकतर्फी प्रेमातून बळजबरीने तो तिचा पाठलाग करायचा. घटनेच्या दिवशी त्यानेच मुलीची छेड काढली. त्यावेळी त्याच्यासोबत आणखी एक साथीदार होता. आरोपीने मुलीचा पाठलाग केला, मुलगी जीव वाचवण्यासाठी पळाली असेल. तिला ट्रेनसमोर ढकलून दिले. ३-४ महिन्यापूर्वीही मुलीसोबत असाच प्रकार घडला होता. तेव्हा आरोपीच्या घरी तक्रार पोहचली होती परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर आजची घटना घडली.
सध्या या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या वडिलांनाही अटक केली आहे. मुलगी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्या उपचारासाठी जो खर्च होईल तो सरकार भरणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून पीडित मुलीच्या कुटुंबाला ५ लाखांची आर्थिक मदत घोषित करण्यात आली आहे. दोषींवर योग्य कारवाई होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.