मुरादाबाद - उत्तर प्रदेशात १२ वीच्या विद्यार्थिनीने अनेक महिन्यांच्या शोषणाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृत्यूपूर्वी या मुलीने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिला त्रास देणाऱ्या युवकांनी माझं आयुष्य नरक बनवलं असा आरोप केला आहे. इतकेच नाही तर स्थानिक पोलिसांच्या कार्यशैलीवरही या घटनेनं प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अनेकदा या विषयावर तक्रार करूनही पोलिसांनी ठोस कारवाई केली नसल्याचा आरोपही लावण्यात आला आहे.
मुरादाबादच्या युवतीने सुसाईड नोटमध्ये म्हटलंय की, मी शाळेत जाणे बंद केले होते. त्यामुळे शिक्षणावर परिणाम झाला. त्रास देणारे युवक श्रीमंत घरातील होते. त्यामुळे पोलीस कारवाई करत नव्हते. पीडित कुटुंबाने धमकी आणि बलात्कार याची तक्रार पोलिसांना दिली होती परंतु त्यांच्याकडून कुठलीही कारवाई झाली नाही असा आरोप मृत मुलीच्या कुटुंबाने लावला.
याबाबत पोलीस अधिकारी हेमराज मीणा म्हणाले की, आरोपी युवकांचे घर पीडित युवतीच्या घराजवळच आहे. मुलीच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून एका युवकाला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याला सोडले. सुसाईड नोटमध्ये मुलीने आरोपी युवकांसोबत पोलीस उपनिरिक्षक सचिन मलिक यालाही जबाबदार धरले आहे. तक्रारीनंतर मुलीचा जबाब न नोंदवणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक सचिन मलिकला या घटनेनंतर तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात योग्य कार्यवाही झाली नाही याची कबुली देत सुसाईड नोटच्या आधारे २ युवकांना अटक करण्यात आली आहे. अजूनही २ जणांचा शोध सुरू आहे. ग्रामीण एसपी संदीप मीणा या प्रकरणाचा तपास करत आहेत असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, माझी मुलगी शिक्षणात हुशार होती. आम्हाला तिच्यासोबत आमच्या भविष्याबाबत खूप अपेक्षा होत्या. परंतु छेडछाड आणि युवकांच्या त्रासामुळे तिच्या शिक्षणावर परिणाम झाला. अलीकडेच होळीच्या दिवशी एक आरोपी घरात घुसला आणि तो मुलीवर जबरदस्ती करत होता. आम्ही एसपी ऑफिस, कुंदारकी पोलीस स्टेशन आणि विभागीय कार्यालयात तक्रार नोंदवली परंतु त्यांनी यावर काहीच कारवाई केली नाही असा आरोप मृत मुलीच्या वडिलांनी केला.