हमीरपूर: उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये वस्तू आणि सेवा कराच्या पथकानं एका गुटखा व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. त्या छापेमारीदरम्यान व्यापाऱ्याच्या घरातून ६ कोटी ३१ लाख ११ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम व्यापाऱ्यानं बेड बॉक्सच्या आतमध्ये लपवली होती.
जप्त करण्यात आलेली रोकड मोजण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी तीन मशीन घेऊन आले होते. रोख रक्कम घेऊन जाण्यासाठी मोठमोठ्या पेट्या आणण्यात आल्या होत्या. ही रक्कम मोजायला जवळपास १८ तास लागले. त्यानंतर रोकड पेट्यांमध्ये भरून नेण्यात आली. पथकासोबत आलेल्या उपायुक्तांनी कारवाईवर काहीही बोलण्यास नकार दिला. सहआयुक्तांकडून सर्च वॉरंट देण्यात आलं होतं. त्यावर कार्यवाही करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
सुमेरपूरमध्ये वास्तव्यास असलेला गुटखा व्यापारी जगत गुप्ताच्या घरावर केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या पथकानं छापा टाकला. पथकामध्ये १५ सदस्य होते. १२ एप्रिलला सकाळी ६ वाजता कारवाईला सुरुवात झाली. १३ एप्रिलला संध्याकाळपर्यंत कारवाई सुरू होती. रात्रीच्या सुमारास बँक कर्मचारी रोकड ठेवण्यासाठी तीन मोठमोठ्या पेट्या घेऊन पोहोचले.
रोकड भरलेल्या पेट्या स्टेट बँक ऑफ हमीरपूरमध्ये नेण्यात आल्या. व्यापाऱ्यानं जीएसटीच्या कागदपत्रांमध्ये हेराफेरी केल्याचा संशय होता. त्यासाठीच धाड टाकण्यात आली होती. मात्र या धाडीदरम्यान ६ कोटींहून अधिकची रोकड जप्त करण्यात आली.