मंगेश कराळे
नालासोपारा :- गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी ८६ लाख १३ हजार रुपयांचे तब्बल ८ किलो ७५० ग्रॅम चरस अंमली पदार्थ जप्त करण्यात यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे.याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून यांनी हा साठा कुठून आणला व यामागे कोणी साथीदार आहेत का याचा गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस तपास करत आहे.
मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये अंमली पदार्थ विक्री आणि तस्करी करणा-या समाज कंटकांवर कारवाई करुन त्यांना पायबंद करण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला सुचना दिल्या आहेत. शुक्रवारी रात्री गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दिमध्ये खराडतारा ब्रीजच्या खाली असलेल्या सर्व्हिस रोडवर कैलास जनार्दन तामोरे (३६) याला विक्री करीता स्वत:च्या कब्जामध्ये बाळगलेल्या १ किलो १ ग्रॅम वजनाचे ११ लाख रुपये किमतीच्या चरस या अंमली पदार्थासह ताब्यामध्ये घेण्यात आले. त्याच्या विरुद्ध मांडवी पोलीस पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वरील गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी कैलास तामोरे याचे साथीदार संकेत विजय तामोरे (३२) आणि निकेश रमेश दवणे (३७) दोघेही राहणार चिंचणी, ता. डहाणु येथून ताब्यामध्ये घेऊन त्यांच्या घरझडतीमध्ये एकुण ७ किलो ६५० ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून एकुण ८ किलो ७५० ग्रॅम वजनाचा ८६ लाख १३ हजार ३५० रुपये किमतीचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना शनिवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, सचिन घेरे, मनोज सकपाळ, सागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनील पाटील, युवराज वाघमोडे, म.सु.ब. गणेश यादव, सागर सोनवणे, प्रविण वानखेडे यांनी पार पाडली आहे.