नवी मुंबई - संपूर्ण जगात सायबर क्राईमचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटनांवरून सायबर गुन्ह्यात मुख्य करून बँकांच्या संगणकीय प्रणालीवर सायबर हल्ला करून करोडो रुपयांवर डल्ला मारल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कॉसमॉस बँकेत घडलेल्या गुन्ह्यात मुंबईतील स्टेट बँक ऑफ मॉरिशस आणि नुकत्याच इस्लामिक स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या संगणक प्रणालींवर सायबर लुटारूनी हल्ला करून शेकडो कोटी रुपये लुटल्याचे उघड झाले होते.
जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बसून सायबर गुन्हेगार डल्ला मारू शकतात. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहर आणि महाराष्ट्रात सर्वाधिक सायबर गुन्हे घडले असून या संदर्भात महाराष्ट्रपोलिसांना सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण देशातील नामांकित सरकारी बँक म्हणून ओळखली जाणारी बँक ऑफ इंडियातर्फे महाराष्ट्र पोलीस खात्यातील निवडक पोलीस अधिकाऱ्यांना सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात प्रशिक्षण देणारी कार्यशाळा नवी मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षणात राज्याच्या पोलिस खात्यातील 35 हून अधिक पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.