मुंबई - रियल इस्टेट क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या ओबेरॉय रियल्टी आणि त्याचे विक्रेते कॅपेसाईट इन्फ्रा प्रोजेक्टस या कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकून महत्वपूर्ण दस्ताऐवज जप्त केला आहे. गृह प्रकल्पाच्या विक्रीसाठीच्या ‘ब्राऊशर’वरील किंमती आणि प्रत्यक्षात नोंदणीकृत किंमतीमध्ये प्रचंड तफावत आढळून आली आहे. त्याचबरोबर अन्य बेनामी व्यवहार केले असल्याचा संशयअसल्याचे आयकर विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.गेल्या दोन महिन्यापासून रियल इस्टेटमधील कंपन्या आयकर विभागाच्या रडार आहेत. देशभरातील विविध कंपन्यांवर छापेमारी करण्यात आलेली आहे. मात्र, मंगळवारी ओबेरॉय रियल्टी व कॅपेसाईट प्रोजेक्टसवर टाकलेल्या छाप्यामुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.आयकर विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार गेल्या आठवड्याभरापासून ओबेरॉय रियल्टी आणि कॅपेसाइटच्या व्यवहाराबाबत माहिती मिळविण्यात येत होती. सर्व तयारी पुर्ण झाल्यानंतर विभागाच्या पथकांनी स्वतंत्रपणे मंगळवारी सकाळपासून कार्यालयावर धाडी टाकल्या. कंपनीकडून बनविलेल्या व विक्री करण्यात आलेल्या फ्लॅट, गाळ्याच्या खरेदीच्या तपशीलासंबंधी कागदपत्रे, नोंदणी दस्ताऐवज व बॅँकांची व्यवहार तपासण्यात आले. या कंपनीने काही दिवसापूर्वी ४०० कोटीच्या मोठ्या प्रकल्पाची नोंदणी घेतली असून त्या व्यवहारातही अनियमितता असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.