नवी दिल्ली : आयकर विभागाने दिल्ली आणि इतर राज्यांत ३८ ठिकाणी विधी कंपनीवर (लॉ फर्म) छापे घालून रोख साडेतीन कोटी रुपये जप्त केले आणि १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार उघडकीस आणले. आयकर विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात वकील मनोज कुमार सिंह यांनी त्यांच्या पक्षकारांकडून (क्लायंटस) त्यांचे वाद मिटवण्यासाठी कथित भरीव अशी रोख रक्कम स्वीकारली, असे म्हटले.
मनोज कुमार सिंह हे व्यावसायिक लवादात तज्ज्ञ समजले जातात. सिंह यांचा संबंध असलेल्या बेहिशेबी रोख व्यवहारांबाबत हे छापे दिल्ली आणि हरयाणात घालण्यात आले याला आयकर विभागाने दुजोरा दिला. सिंह यांनी त्यांच्या पक्षकारांकडून (क्लायंटस) त्यांचे वाद मिटवण्यासाठी कथित भरीव रक्कम घेतली. रोख रक्कम आणि दस्तावेजांशिवाय दहा लॉकर्सवरही विभागाने निर्बंध आणले आहेत.पैसा पुरवणारे आणि बिल्डर्सचा सहभाग असलेल्या बेहिशेबी व्यवहारांची भरीव डिजिटल माहितीही ताब्यात घेण्यात आलीआहे.काय आहे प्रकरण?एका विशिष्ट प्रकरणात सिंह यांनी ११७ कोटी रुपये पक्षकाराकडून घेतले. परंतु, त्यांच्या दप्तरांत फक्त २१ कोटी रुपयांची तेही धनादेशाद्वारे मिळाल्याची नोंद केली. सीबीडीटीने दुसरे एक प्रकरण उघड केले. त्यात म्हटले आहे की, मनोज कुमार सिंह यांनी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम इन्फ्रास्ट्रक्चर अँड इंजिनिअरिंग कंपनीकडून तिचा जो वाद सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीशी होता त्याच्या लवाद प्रक्रियेसाठी घेतले.