उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी आयकर विभाग, ईडी आणि जीएसटीच्या टीमनी कारवाया सुरु केल्या आहेत. या सर्व 63 टीम आहेत. गुरुवारी आयकर विभागाच्या टीमने कन्नौजच्या एका मोठ्या अत्तर व्यापाऱ्यावर छापा टाकला. त्याच्याकडे एवढे पैसे सापडले आहेत की, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना नोटा मोजण्यासाठी मशीन मागवाव्या लागल्या आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये सध्या थंडीचे वातावरण आहे. तरी देखील आयटी विभागाच्या टीम छापे टाकत आहेत. सपाच्या नेत्यांवर छापे मारल्याने उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण तापलेले आहे. आयकर विभागाने व्यापाऱी, मोठमोठे अधिकारी यांनादेखील रडारवर घेतले आहे. कानपूरमध्ये बुधवारी शिखर पान मसाल्याच्या संचालकांच्या घरावरही जीएसटीच्या टीमने छापे टाकले होते. गुरुवारी अत्तर व्यापारी पीयूष जैन यांच्या घरी छापा टाकण्यात आला.
जूही पोलीस ठाणे क्षेत्रात आनंदपुरीपमध्ये राहणाऱ्या पीयूष जैन यांचा कन्नौजमध्ये अत्तराचा व्यवसाय आहे. पीयूष जैन हे समाजवादी पक्षाच्या जवळचे आहेत. पीयूष यांचा अत्तराचा व्यापार अन्य राज्यांमध्येदेखील पसरलेला आहे. गुरुवारी सकाळी सकाळीच आयकर विभागाच्या टीमने त्यांच्या घरी छापा मारल्याने खळबळ उडाली आहे.
जैन यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जैन यांच्या सुरक्षा रक्षकांना बाहेर ठेवण्यात आले आहे. कागदपत्रे आणि अन्य गोष्टी तपासल्या जात आहेत.