बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. काही दिवसांपूर्वी तिची दिल्लीत ईडीच्या कार्यालयात झाडाझडती झाली. मनी लाँड्रिग प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात तिचा जबाब नोंदवला गेला. आता जॅकलिनला ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स पाठवले आहे. २५ सप्टेंबर रोजी तिला चौकशीसाठी ईडीने बोलावले आहे. जॅकलिनची चौकशी होत असल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सुकेश चंद्रशेखरनिगडित एका मनी लाँड्रिग प्रकरणात ही चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात मनी लाँड्रिगची केस आहे.
कोण आहेत सुकेश चंद्रशेखर?२३ ऑगस्ट रोजी अंमलबजावणी संचालनालयाने चेन्नई स्थित सुकेश चंद्रशेखर आणि चित्रपट अभिनेत्री लीना पॉल यांच्या बंगल्यावर छापा टाकला होता, ज्यांनी तिहार जेलमधून सर्वात मोठी खंडणी (२०० कोटी) वसूल केली होती. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने कोस्ट रोडवरील सुकेश यांच्या बंगल्यावर छापा टाकला, त्या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये सांगितली गेली आहे. छाप्यादरम्यान कारवाई करत, ईडीने मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आणि सुमारे १५ आलिशान वाहने देखील जप्त करण्यात आली.