मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणामुळे मुंबई हादरली. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून मुंबई पोलिसांकड़ून विशेष ख़बरदारी घेत गस्तीवर भर दिला आहे. तसेच अंधाराच्या तसेच निर्जन स्थळी क्यूआर कोड लावून गस्त वाढविण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहे.
पोलीस आयुक्तांनी परिपत्रक काढून महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. आयुक्तांनी दिलेल्या माहितीत, साकीनाका घटनेच्या वेळी पोलिसांचा प्रतिसाद १० मिनिटाचा होता. अशा घटनांमध्ये नियंत्रण कक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून कोणताही कॉल विशेषत: महिलांच्या संदर्भातील कॉलकडे दुर्लक्ष करू नका.तात्काळ प्रतिसाद देत योग्य ती ख़बरदारी घ्या. तसेच नियंत्रण कक्षाचे प्रभारी अधिकारीनी यावर सतत लक्ष ठेवावे असे सांगितले.
पोलीस ठाणे हद्दीतील अंधाराची ठिकाणी तसेच निर्जन ठिकाणांचा आढावा घेवून निर्जनस्थळी गस्त वाढविणे गरजेचे आहे. तसेच सर्व ठिकाणी महानगरपालिकेसोबत पत्रव्यवहार करून सीसीटीव्ही तसेच लाईटसाठी पाठपुरावा करावा. अशा ठिकाणी क्यू आर कोड लावून गस्तीवरील वाहने, गस्त करणारे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी लक्ष ठेवावे, जेणेकरून वेळीच अनुचित प्रकार टाळता येईल. शिवाय प्रसाधन गृहाबाहेरही लाईटची व्यवस्था करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहे. संशयिताकडे चौकशी करत योग्य ती कारवाई करावी असेही आयुक्तांनी नमूद केले आहे. रात्री गस्ती दरम्यान एकटी महिला दिसताच तिला तात्काळ मदत करावी. अंमली पदार्थाची नशा करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी शिवाय, रस्त्यावर बऱ्याच दिवसांपासून उभ्या असलेल्या टेम्पो, टॅक्सी, ट्रक व गाड्यांचा मालकांचा शोध घेऊन वाहने त्यांना तेथून काढण्यास सांगावी. अन्यथा पुढील कारवाई करावी अशाही सूचना आयुक्तांकड़ून देण्यात आल्या आहेत.
लांब पल्ल्याच्या गाड्याबाहेर पहारा...
लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या रेल्वे स्थानकाबाहेर रात्री १० ते सकाळी ७ वाज़ेपर्यंत अंमलदार, अधिकारी तैनात करण्यात यावे. एकट्या दिसणाऱ्या महिलांना निश्चित स्थळी सुरक्षितपणे पोहचविण्याची व्यवस्था करण्याबाबतही आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.