पणजी - गुन्ह्यांचा आणि गुन्हेगारांचा छडा लावण्याच्या प्रमाणात गोवापोलिसांनी यंदा चांगली कामगिरी बजावताना ८२ टक्क्यावरून ८५ टक्क्यांवर नेली आहे. अमली पदार्थांच्या व्यवहारावरही अंकुश ठेवण्यास खात्याला बऱ्याच प्रमाणात यश आले आहे.
गोवचे पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी पोलीस स्थापनादिनी केलेल्या भाषणात ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘गोवापोलिसांच्या कामगिरीचा दर्जा उंचावत आहे. गुन्हेगारीची प्रकरणाचा छडा लावण्यास व गुन्हेगारांना पकडण्यास ३ टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. अमली पदार्थांच्या व्यवहारावरही रोख लावण्यास यश आले आहे. गोवा पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाई मोहिमेत वर्षभरात एकूण २१५ छापे टाकण्यात आले आहेत. त्यातून ७९ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात यश मिळाले आहे.’
पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठीही अनेक गोष्टी करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. त्यात गृहनिर्माणासाठी देण्यात आलेले ५५ लाख रुपयांचे कर्ज व इतर उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. यंदा १३५ पोलिसांना बढत्या देण्यात आल्या तर १६७६ जणांना सेवेत कायम करण्यात आल्याचेही सिंग यांनी सांगितले.