वाशिम : गत महिन्यात ३० ऑगस्ट रोजी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानांतर्गत चालणाऱ्या शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ‘ईडी’च्या पथकाने धाडी टाकल्या. त्याची जोरदार चर्चा अद्यापपर्यंत सुरू असतानाच ३ सप्टेंबर रोजी ‘ईडी’ त्रिसदस्यीय पथक पुन्हा वाशिम येथे दाखल झाले असून सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात धडक देऊन पथकाने गवळींच्या संस्थांशी संबंधित दस्तावेजांची तपासणी केली. यामुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
विद्यमान खासदार गवळी यांनी त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात विविध माध्यमातून १०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी वाशिम येथे २० ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत केला होता. घोटाळ्यांसंबंधीचे सर्व सबळ पुरावे आपणाकडे असून यासंबंधी ‘ईडी’कडेही तक्रार दाखल केली, असे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. त्याच्या १० दिवसानंतरच ३० ऑगस्ट रोजी ईडीच्या चमूने खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानअंतर्गत चालणाऱ्या पाच संस्थांमध्ये धाडी टाकून दस्तावेजांची तपासणी केली. हे प्रकरण तिथेच संपुष्टात येणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र चारच दिवसांत पुन्हा ईडीचे त्रीसदस्यीय पथक ३ सप्टेंबर रोजी पुन्हा वाशिम येथे दाखल झाले. पथकाने थेट धर्मादाय आयुक्त कार्यालय गाठून महिला उत्कर्ष प्रतिष्ठानांतर्गत चालणाऱ्या संस्थांशी संबंधीत दस्तावेजांची तपासणी केली. यामुळे खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.