मुंबई - मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर सवाल निर्माण करणारा खळबळजनक अहवाल प्रजा फाऊंडेशनने जाहीर केला आहे. गेल्या काही वर्षात मुंबईत बलात्कार, विनयभंग आणि दंगली यांसारख्या अत्यंत गंभीर घटनांमध्ये वाढ झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
2013 -14 ते 2017- 18 पर्यंतच्या अहवालानुसार, बलात्कार, विनयभंग आणि दंगलींसारख्या गुन्ह्यात अनुक्रमे 83%, 95%, 36% वाढ झाली. 2015-16 ते 2017-18 या आर्थिक वर्षात लैंगिक गुन्ह्यांपासून बालक संरक्षण अधिनियम (पॉक्सो) या कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये 19 % वाढ झाली. 2015- 16 मध्ये एकूण 891 पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले, तर हेच प्रमाण 2017-18 याच तक्रारींचे प्रमाण 1062 इतके नोंदविले आहे. जुलै 2018 पर्यंत मुंबई पोलीस दलात 22% कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तर 32% लोकांना पोलीस आणि कायदेशीर यंत्रणेवर विश्वासच नाही, म्हणून त्यांनी पोलिसांना आपल्याबद्दल घडलेल्या गुन्ह्याबाबत माहितीच दिली नाही. 23% लोकांच्या मते, पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणे एक वेदनादायक गोष्ट आहे. गुन्हा घडताना पाहिलं, मात्र तरीही पोलिसांना माहिती न देणाऱ्यांची संख्या 25% आहे. कारण ते पोलिसांच्या चौकशीत अडकू इच्छित नव्हते. प्रजा फाऊंडेशनच्या या अहवालावरून मुंबईतील वाढती गुन्हेगारी चिंताजनक असून शासकीय - प्रशासकीय पातळीवरही निराशेचं वातावरण आहे. त्यामुळे याचा पोलीस यंत्रणेसह राज्याच्या गृहविभागाला गांभिर्याने विचार करावा लागणार आहे.